वेस्ट बँकमधील हिंसाचारामुळे जॉर्डनच्या मध्यस्थीने झालेली इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्षबंदी धोक्यात

जेरूसलेम – पॅलेस्टिनी हल्लेखोराच्या गोळीबारात दोन इस्रायली नागरिकांचा बळी गेला. याचे तीव्र पडसाद उमटले असून संतप्त इस्रायली नागरिकांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींच्या घरांवर हल्ले चढविले व मोटारींची जाळपोळ केली. यामध्ये एक पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा केला जातो. यानंतर इस्रायलने वेस्ट बँकमधील जवानांची तैनाती वाढविली आहे. दरम्यान, वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींकडून इस्रायलवर होणारे हल्ले रोखण्यासाठी जॉर्डनने इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रशासनात मध्यस्थी करून संघर्षबंदी घडविली होती. पण रविवारच्या घटनेनंतर ही संघर्षबंदी धोक्यात आल्याचे दिसू लागले आहे.

पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये हमास व इस्लामिक जिहादशी संलग्न असलेले कट्टरपंथी तसेच एकांड्या दहशतवाद्यांकडून ज्यूधर्मियांवरील हल्ले वाढले आहेत. पॅलेस्टाईनमधील या जहाल संघटना इस्रायलमध्ये घातपात घडवून निरपराध नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. तर गेल्या दोन महिन्यांमध्ये इस्रायलने केलेल्या कारवाईत 62 पॅलेस्टिनी ठार झाल्याचा ठपका पॅलेस्टिनी सरकारने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर, जॉर्डनने मध्यस्थी घडवून इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू केली होती.

जॉर्डनमध्ये पार पडलेल्या या बैठकीत इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नेत्यांमध्ये वेस्ट बँक भागात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यावर एकमत झाले होते. यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचेही दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी मान्य केले होते. जॉर्डनमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीत अमेरिका व इजिप्तचे अधिकारी देखील सहभागी झाले होते. पॅलेस्टाईनमधील काही कट्टरपंथीय नेत्यांनी या बैठकीच्या निकालावर तसेच जॉर्डनच्या मध्यस्थीवर ताशेरे ओढले होते. मात्र या यशस्वी बैठकीमुळे पूर्व जेरूसलेम तसेच वेस्ट बँकमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबेल, असा दावा केला जात होता.

पण रविवारी सकाळी वेस्ट बँकच्या नेब्लस शहरातील हवाराच्या रस्त्यावर अज्ञात हल्लेखोराने दोन ज्यूधर्मियांना गोळ्या झाडून ठार केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. पण या हल्ल्यानंतर संतापलेल्या ज्यूधर्मियांनी वेस्ट बँकच्या उत्तरेकडील भागात निदर्शने सुरू केली. या निदर्शनांना हिंसक वळ मिळाले व नेब्लस शहराच्या झातारा गावात इस्रायली नागरिकाच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी तरुण ठार झाल्याचा आरोप पॅलेस्टिनी यंत्रणा करीत आहेत.

रविवार रात्रभर उत्तर वेस्ट बँकच्या वेगवेगळ्या भागात या जमावाने मोठमोठ्या घोषणा देऊन पॅलेस्टिनींच्या घरांची व मालमत्तेची जाळपोळ केली. यात किमान 30 घरे आणि गाड्यांचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. अमेरिका, युरोपिय महासंघाने या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच दोन्ही प्रशासनांनी हा हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन या देशांनी केले.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी संतप्त जमावाला शांतता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच नेब्लस व इतर शहरात लष्कराची तैनाती वाढविली आहे. मात्र या हिंसाचारामुळे जॉर्डनच्या मध्यस्थीने झालेली संघर्षबंदी धोक्यात आली असून कुठल्याही क्षणी इथे नवा संघर्ष पेट घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

leave a reply