जम्मू-काश्मीरमध्ये घातपात माजविणारा आणखी एक दहशतवादी पाकिस्तानात ठार

कराची – ‘अल बद्र’ या जम्मू व काश्मीरमध्ये घातपात माजविणाऱ्या दहशतवादी संघटनेचा कमांडर ‘सईद खालिद रझा’ पाकिस्तानच्या कराची शहरात ठार झाला. अज्ञात मारेकऱ्यांनी रझा याला त्याच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून संपविले. काही दिवसांपूर्वी हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता बशिर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याला पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात ठार करण्यात आले होते. रझा याच्या हत्येची जबाबदारी ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ने स्वीकारली आहे. भारतात घातपात माजविणाऱ्या दहशतवाद्यांचा परस्पर काटा निघत असताना यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा हवालदिल बनल्याचे दिसते आहे.

triggering an ambush in Jammu and Kashmirजम्मू व काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवाद माजविणाऱ्यांमध्ये ‘सईद खालिद रझा’ याचा समावेश होता. तब्बल आठ वर्ष हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर म्हणून रझा याने दहशत माजविली होती. पाकिस्तानातील ‘जमात-ए-इस्लामी’शी जोडलेली संघटना असा ‘अल बद्र’चा उल्लेख केला जातो. अल बद्रने 90च्या दशकात हिजबुल मुजाहिद्दीनबरोबर सहकार्य करून जम्मू व काश्मीरमध्ये मोठे घातपात घडविले होते. त्या काळात रझा हिजबुलसाठीकाम करीत होता. पण 1998 साली अमेरिकेने अल बद्रला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर या संघटनेच्या नावाखाली काम करणे दहशतवाद्यांसाठी अवघड बनले होते. त्यामुळे रझा पाकिस्तानात परतला होता.

भारतात घातपात माजविणारा हा दहशतवादी पाकिस्तानच्या कराची शहरातील एका शाळेच्या व्यवस्थापनात वरिष्ठ पदावर काम करीत होता. रविवारी कराचीमधील ‘गुलिस्तान-ए-जोहर’च्या ब्लॉक7 भागातील आपल्या राहत्या घरातून रझा बाहेर पडला. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अतिशय जवळून गोळीबार करून रझा याला जागच्या जागीच ठार केले. या हल्ल्याबाबत कराचीचे पोलीस व पाकिस्तानची माध्यमे परस्परविरोधी दावे करीत आहेत. हा दहशतवादी हल्ला नव्हता, तर लुटमारीसाठी रझा या खून करण्यात आल्याचा दावा कराची पोलिसांनी केला आहे.

तर पाकिस्तानी माध्यमांनी रझा याच्याकडील मौल्यवान वस्तू जशाच्या तशाच पडून होत्या, याकडे लक्ष वेधून कुणीतरी रझा याचा काटा काढल्याचा दावा केला आहे. दरम्यान, इम्तियाज आलम व त्यानंतर सईद खालिद रझा या जम्मू व काश्मीरमध्ये घातपात घडविणाऱ्या दहशतवाद्यांच्या हत्येने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ने रझा याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग नसून हा स्वतंत्र देश आहे, असे ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’चे म्हणणे आहे. सिंधूदेशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे काही गट शस्त्रे हाती घेऊन आपल्याला पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे असल्याचे जाहीर करीत आहेत. अशा परिस्थितीत रझा हा पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयचा हस्तक होता, असा आरोप करून ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ने त्याला ठार केले, असे या संघटनेने सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

याआधी हिजबुलचा दहशतवादी इम्तियाज आलम याच्या हत्येला भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’ जबाबदार असल्याचे आरोप पाकिस्तानातून झाले होते. अशा परिस्थितीत रझा याची हत्याही भारतानेच घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानातून होऊ शकला असता. पण ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून पाकिस्तानला धक्का दिला आहे. तर पाकिस्तानातील अंतर्गत संघर्षात भारतात घातपात माजविणाऱ्या दहशतवाद्यांचा परस्पर काटा निघत आहे, असा दावा करून सोशल मीडियावर भारतीय यावर समाधान व्यक्त करीत आहेत.

leave a reply