इराणकडे पाच अणुबॉम्ब तयार होतील इतके संवर्धित युरेनियम

- इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांचा आरोप

अथेन्स – ‘इराण एका हाताने या क्षेत्रात शस्त्रास्त्रे पुरवून दहशतवादी संघटनांचा विस्तार आहे. तर दुसऱ्या हाताने आपली आण्विक लष्करी क्षमता विकसित करीत आहे. म्हणूनच इराणबाबत कुणीही गैरसमज करुन घेऊ कामा नये. कारण एका अणुबॉम्बवर इराण समाधान मानणार नाही. सध्या इराणने पाच अणुबॉम्बची निर्मिती करता येईल इतक्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन केले आहे’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी दिला. मात्र काही झाले तरी इस्रायलला इराणला अण्वस्त्रसज्ज बन देणार नाही व सिरियात तळही ठोकू देणार नसल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केली.

इराणकडे पाच अणुबॉम्ब तयार होतील इतके संवर्धित युरेनियम - इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांचा आरोपरशिया-युक्रेन युद्धामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाकडे जगाचे दुर्लक्ष झाले आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणबाबत सर्वात वेगळी भूमिका स्वीकारली आहे. काही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असे अमेरिकेच्या प्रत्येक सरकारचे धोरण होते. इस्रायल व अरब मित्रदेशांनी अमेरिकेच्या या धोरणाला नेहमीच समर्थन दिले होते. पण गेल्या महिन्यात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले सिनेटसमोरच्या सुनावणीमध्ये, इराणला अण्वस्त्रांची तैनाती करू देणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे बायडेन प्रशासन इराणला अण्वस्त्रांच्या निर्मितीपासून रोखणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याचबरोबर इराण अणुबॉम्बच्या निर्मितीपासून अवघे काही आठवडे दूर असल्याचा दावा पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी केला होता.

याआधी इराणचा अणुकार्यक्रम अणुबॉम्बच्या निर्मितीपासून वर्षभर व त्यानंतर काही महिने दूर असल्याचे दावे अमेरिकेने केले होते. पण इराण ब्रेकिंग पॉईंटच्या जवळ पोहोचल्याची अप्रत्यक्ष कबुली बायडेन प्रशासनाने दिल्यामुळे जोरदार टीका झाली होती.

याच सुमारास इराणने किमान 84 टक्के इतके युरेनियमचे संवर्धन केल्याची धक्कादायक माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली होती. बायडेन प्रशासनाने अणुऊर्जा आयोगाच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळून इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडविण्याची मवाळ भूमिका स्वीकारली होती. पण इराणच्या अणुकार्यक्रमाचा प्रश्न लष्करी कारवाईशिवाय सुटू शकणार नसल्याचे इस्रायलमधील पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे सरकार सांगत आहे.

इराणकडे पाच अणुबॉम्ब तयार होतील इतके संवर्धित युरेनियम - इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांचा आरोपग्रीसच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी देखील इराणचा अणुकार्यक्रम अणुबॉम्बच्या निर्मितीपर्यंत पोहोचत असल्याची आठवण करून दिली. पण ‘इराणने 90 टक्के इतक्या प्रमाणात युरेनियम संवर्धनाची मर्यादा ओलांडली तर ती गंभीर चूक ठरेल व त्यामुळे या क्षेत्रात भडका उडेल’, असा इशारा गॅलंट यांनी दिला. सिरियातील इराणच्या शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा मुद्दाही इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी उपस्थित केला.

गेल्या सहा महिन्यांपासून दर आठवड्याला शस्त्रास्त्रांनी भरलेले इराणचे विमान सिरियामध्ये दाखल होत आहे. ही शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांना पुरविली जात आहेत. इस्रायलची या हालचालींवर नजर असून इस्रायल कुठल्याही परिस्थितीत इराणला सिरियात तळ ठोकू देणार नसल्याचे गॅलंट यांनी बजावले. गेल्या काही दिवसांपासून सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर झालेल्या हवाई हल्ल्यांवर बोलण्याचे गॅलंट यांनी टाळले. पण ग्रीसची सुरक्षा यंत्रणा व इस्रायलच्या मोसादने इराणचा दहशतवादी हल्ल्याचा कट यशस्वीरित्या उधळला, याचा उल्लेख गॅलंट यांनी केला. ग्रीसमधील इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्यासाठी इराणने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा वापर केला होता, याकडे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.

हिंदी English

 

leave a reply