‘दुष्ट शक्तीं’विरोधात इस्रायलचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील

- इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा

इस्रायलचा संघर्षजेरूसलेम/सना – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या लताकिया बंदरावर क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचा आरोप सिरियाच्या लष्कराने केला. यामध्ये इराणच्या लष्करी तळावरील शस्त्रास्त्रांचा कंटेनर नष्ट झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला. यानंतर अवघ्या काही तासात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी थेट उल्लेख टाळून इराणला इशारा दिला. ‘इस्रायलचे लष्कर दिवसरात्र या क्षेत्रातील दुष्ट शक्तींविरोधात संघर्ष करीत आहे व यापुढेही तो असाच सुरू राहील’, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले.

मंगळवारी पहाटे सिरियाच्या पश्‍चिमेकडील लताकिया बंदरावर जोरदार हवाई हल्ले झाले. या ठिकाणी उभ्या केलेल्या कंटेनर्सवर ही क्षेपणास्त्रे कोसळली. हल्ल्यावेळी कंटेनरजवळ कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली. पण या हल्ल्यात कंटेनर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे, स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. या ठिकाणी पाच मोठे स्फोट ऐकू आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण सिरियातील अस्साद राजवटीशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले.

इस्रायलचा संघर्षइस्रायलच्या लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन वृत्तवाहिनीने केला. पण सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने वेळीच कारवाई करून इस्रायलची क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याचा दावा या वृत्तवाहिनीने सिरियन लष्करी अधिकार्‍याच्या हवाल्याने केला. त्याचबरोबर सिरियन अग्नीशमन दलाने या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याचे लष्करी अधिकार्‍याने सांगितले. लताकिया हा सिरियाचा सर्वात महत्त्वाचा बंदर म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांतील कंटेनर्स याच बंदरात उतरविली जातात आणि साठविलीही जातात. गेल्या काही वर्षांपासून या बंदराचा वापर करून इराण सिरियामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करीत आहे. पुढे ही शस्त्रास्त्रे लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला पुरविली जात असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.

इस्रायलचा संघर्षहिजबुल्लाहला होणारी ही तस्करी रोखण्यासाठी इस्रायल आवश्यक ती कारवाई करील, असे इस्रायलच्या नेत्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे या हल्ल्यामागे देखील इस्रायल असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. आत्तापर्यंत इस्रायलने सिरियातील हल्ल्यांची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारलेली नाही. परदेशी माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यांवर प्रतिक्रिया देणे, आपल्या नियमात बसत नसल्याची इस्रायली लष्कराची भूमिका आहे. पण मंगळवारी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सायप्रस आणि ग्रीसच्या पंतप्रधानांबरोबरच्या भेटीनंतर इराणला दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

‘इस्रायलचे लष्कर दिवसरात्र या क्षेत्रातील दुष्ट शक्तींविरोधात संघर्ष करीत आहे. एका सेकंदासाठीही हा संघर्ष थांबणार नाही. विध्वंसक शक्तींच्या विरोधात यापुढेही असाच सुरू राहील, इस्रायल अजिबात माघार घेणार नाही’, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले. सिरियातील हल्ल्यानंतर अवघ्या काही तासात इस्रायली पंतप्रधानांनी दिलेला हा इशारा इराण व इराणसंलग्न हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांसाठी असल्याचा दावा केला जातो.

leave a reply