इस्रायल, युएई, बहारिनमध्ये ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी

-गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले

वॉशिंग्टन – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल, संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि बहारिन यांनी ऐतिहासिक ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी केली. हा करार म्हणजे नव्या आखाताची पहाट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. याबरोबरच सौदी अरेबियासह पाच ते सहा देश इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार असल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला. अमेरिकेत झालेल्या या कराराचे पाश्चिमात्य तसेच काही अरब देशांमधून स्वागत होत असताना पॅलेस्टाईनच्या दोन्ही गटांनी याचा निषेध केला. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींनी सदर कराराविरोधात निदर्शने केली तर हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले.

इस्रायल, युएई, बहारिनमध्ये ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी - गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्लेमंगळवारी सकाळी व्हाईट हाऊसच्या ‘साऊथ लॉन’मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू, ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाह बिन झईद आणि बहारिनचे परराष्ट्रमंत्री अब्दुललतीफ अल झयानी यांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी केली. इस्रायल, युएई आणि बहारिन आता परस्पर देशांमध्ये दुतावास सुरू करू शकतील. राजदूत नियुक्त करतील आणि सहकारी देश म्हणून काम करतील. यूएई आणि बहारिनने या कराराला ऐतिहासिक म्हटले आहे.

इस्रायल, युएई, बहारिनमध्ये ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी - गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले‘गेल्या कित्येक दशकांच्या मतभेद आणि संघर्षानंतर नव्या आखाताची पहाट अनुभवण्यासाठी आज आपण सारे एकत्र जमलो आहोत’, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सदर करारावर स्वाक्षरी करण्याआधी जाहीर केले. या करारानंतर उर्वरित अरब देशही याच दिशेने वाटचाल करतील अशी आशा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी व्यक्त केली. इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाच ते सहा अरब देश तयार असल्याचे ट्रम्प या करारानंतर म्हणाले. सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून योग्य वेळी सौदी या करारात सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.

पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील वाद मिटेपर्यंत अरब देशांनी प्रतिक्षा करावी असे आवाहन पॅलेस्टाईनने केले आहे. इस्रायल पॅलेस्टाईनच्या ताबा मिळवलेल्या भूभागातून माघार घेत नाही, तोपर्यंत, आखातात शांती प्रस्थापित होणार नसल्याचा इशारा पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास यांनी दिला. यावेळी वेस्टबँकच्या शहरांमधून या कराराविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. तर करारावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम सुरू असताना गाझापट्टीतून इस्रायलच्या दिशेने १३ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

इस्रायल, युएई, बहारिनमध्ये ‘अब्राहम करारा’वर स्वाक्षरी - गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्लेदरम्यान, इस्रायल, युएई व बहारिन यांच्यातील या करारावर इराण, तुर्की या देशांनी याआधीच टीका केली होती. इस्रायलबरोबर संबंध सुरळीत करण्याची घोषणा करणार्‍या बहारिनला इराणने काही तासांपूर्वीच धमकावले होते. इस्रायलबरोबरच्या या सहकार्यासाठी बहारिनच्या राजवटीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी इराणने दिली होती. तर आखाताच्या सुरक्षेला इराणचा धोका वाढत असताना इस्रायलशी केलेले सहकार्य फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया बहारिनने दिली आहे.

leave a reply