इस्रायल-युएईमधील मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू

जेरूसलेम – अंतर्गत राजकारणामुळे इस्रायल पेटलेले असताना पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार अरब देशांबरोबरील आपले सहकार्य मजबूत करीत आहेत. पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या उपस्थितीत इस्रायल आणि युएईमधील मुक्त व्यापारी कराराची अंमलबजावणी सुरू झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये झालेल्या नव्या करारानुसार, ९६ टक्के उत्पादनांवरील करामध्ये कपात केली जाणार आहे.

इस्रायल-युएईमधील मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरूगेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायल आणि युएईमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह इकोनॉमिक पार्टनरशीप ॲग्रीमेंट-सीईपीए’ हा मुक्त व्यापारी करार पार पडला होता. २०२० साली अब्राहम कराराअंतर्गत सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतरचा इस्रायल व युएईमधील हा लक्षवेधी करार ठरला होता. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारात वाढ होईल. तसेच युएईकडून प्रसिद्ध होणाऱ्या निविदांमध्ये इस्रायली कंपन्याही सहभागी होऊ शकतात, अशी माहिती समोर आली होती. पुढील पाच वर्षात उभय देशांमधील सहकार्य १० अब्ज डॉलर्सच्या पलिकडे नेण्याचे मान्य करण्यात आले होते. या करारामुळे अवघ्या वर्षभरात दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पटीने वाढल्याचे समोर आले होते. २०२१ साली इस्रायल-युएईमध्ये १.२२ अब्ज डॉलर्स व्यापार होता. तर २०२२ साली हाच व्यापार २.५६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या उपस्थितीत इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन आणि इस्रायलमधील युएईचे राजदूत मोहम्मद अल खाजा यांच्यात ‘कस्टम्स ॲग्रीमेंट’ करार पार पडला. यानुसार दोन्ही देशांमधील उत्पादनांवरील करात ९६ टक्के कपात केली जाईल. याचा फायदा उभय देशांमधील गुंतवणूक वाढेल तसेच रोजगार निर्मिती होईल, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला.

हिंदी

 

leave a reply