पॅलेस्टिनींनी इस्रायलमधील अस्थैर्याचा फायदा घ्यावा

- इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सची चिथावणी

तेहरान – इस्रायली सरकार व विरोधकांमध्ये जबरदस्त राजकीय संघर्ष सुरू आहे. यामुळे इस्रायलमध्ये माजलेल्या अस्थैर्याचा फायदा घेऊन या देशात अधिकाधिक प्रमाणात अराजक माजवा. पॅलेस्टिनी लढवय्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यायलाच हवा, अशी चिथावणी इराणने दिली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल रमझान शरीफ यांनी पॅलेस्टिनींना हे आवाहन केले. यावर इस्रायलच्या सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.

पॅलेस्टिनींनी इस्रायलमधील अस्थैर्याचा फायदा घ्यावा - इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सची चिथावणीगेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांवर इराणची नजर होती. पण इराणच्या राजवटीने इस्रायलमधील या निदर्शनांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. सदर निदर्शनांचे समर्थन केल्यास इस्रायल एकजूट होईल आणि सिरियातील आपल्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविल, अशी भीती इराणला सतावीत होती, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. पण रविवारी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या निदर्शनांचे समर्थन करणाऱ्या संरक्षणमंत्री गॅलंट यांची हकालपट्टी केल्यानंतर उत्साह वाढलेल्या इराणकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याविरोधात सुरू असलेल्या अस्थैर्याचा पॅलेस्टिनींनी लाभ घ्यावा, असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल शरीफ यांनी म्हटले आहे. इस्रायलमधील हेच मतभेद या देशाच्या विनाशाला कारणीभूत ठरतील, असा दावा शरीफ यांनी केला. त्यामुळे पॅलेस्टिनी तरुणांनी इस्रायलमधील अस्थैर्यात भर टाकण्याची सुवर्णसंधी चुकवू नये, अशी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पॅलेस्टिनींनी ही संधी साधली तर जेरूसलेमचे स्वातंत्र्य फार दूर नाही, असा दावा शरीफ यांनी केला.

अमेरिकेचे बायडेन प्रशासन व इस्रायलमधील पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या सरकारमधील मतभेद तीव्र झाले असून इस्रायलच्या सरकारने न्यायालयीन सुधारणांचा निर्णय मागे घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सुचविले होते. पॅलेस्टिनींनी इस्रायलमधील अस्थैर्याचा फायदा घ्यावा - इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सची चिथावणीराष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या मुद्यावरुन नेत्यान्याहू सरकारवर हल्ला चढविला आहे. ‘इस्रायलचे सरकार अशा प्रकारे काम करू शकत नाही. पंतप्रधान नेत्यान्याहू नक्कीच आपल्या भूमिकेत तडजोड करतील’, असा दावा बायडेन यांनी केला. यावर खवळलेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांनी कठोर शब्दात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना उत्तर दिले.

‘इस्रायल हा सार्वभौम देश आहे. आपल्या जनतेच्या इच्छेनुसार इस्रायल आपले निर्णय घेतो. अगदी मित्रदेशांनी टाकलेल्या दबावाचा देखील इस्रायल आपल्या निर्णयावर परिणाम होऊ देत नाही’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी फटकारले. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी राष्ट्रवादी नेत्यांसह इस्रायलमध्ये संघटित केलेल्या सरकारवर अमेरिकेने याआधीच आपली नाराजी व्यक्त केली होती. नेत्यान्याहू यांच्या सरकारमधील नेत्यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश देण्यास बायडेन प्रशासनाने नकार दिला होता.

इस्रायल आपल्या बळावर नाही, तर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या ताकदीवर या क्षेत्रातील सर्वच देशांना आव्हान देत असल्याचे इराण तसेच इस्रायलचे इतर शत्रूदेश सातत्याने सांगत आले आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलचे अमेरिकेबरोबरील मतभेद वाढलेले असताना आणि इस्रायल अंतर्गत वादामध्ये अडकलेला असताना, पॅलेस्टिनींनी त्याचा लाभ घ्यावा, असे इराण सुचवित आहे. म्हणूनच इस्रायलकडून यावर तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

हिंदी

 

leave a reply