पाश्चिमात्यांनी इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर स्वीकारलेल्या कठोर भूमिकेचे इस्रायलकडून स्वागत

अणुकराराच्या मुद्यावरजेरूसलेम – अमेरिका व युरोपिय देश इराणबरोबर अणुकरार करण्यास तयार नसल्याचे उत्साहवर्धक संकेत मिळत आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी म्हटले आहे. एकाच दिवसापूर्वी फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या युरोपातील ‘ई३’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बड्या देशांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर संशय व्यक्त केला होता. नजिकच्या काळात इराणबरोबर अणुकरार होऊ शकत नाही, असे या देशांनी स्पष्ट केले होते. त्यावर समाधान व्यक्त करून इस्रायलच्या पंतप्रधानांनी हा आपल्या सरकारच्या राजनैतिक मोहिमेला मिळालेला विजय असल्याचे म्हटले आहे. मात्र अजूनही या मुद्यावर इस्रायलला फार मोठी वाटचाल करायची आहे, असा दावा पंतप्रधान येर लॅपिड यांनी केला.

काही आठवड्यांपूर्वीच इराणबरोबरील अणुकरार दृष्टीपथात असल्याचे अमेरिका व युरोपिय देशांनी म्हटले होते. मात्र या अणुकरारासाठी इराणने ठेवलेल्या शर्ती मान्य करता येणार नाहीत, असे सांगून अमेरिका व ई३ देशांनी इराणला यावर कडक शब्दात समज दिली आहे. त्यामुळे सध्या तरी हा अणुकरार होणार नसल्याचे संकेत मिळत असून इस्रायलच्या पंतप्रधानांनी ही बाब उचलून धरली आहे. आक्रमक भूमिका न घेता इस्रायलच्या सरकारने राजनैतिक पातळीवर इराणच्या अणुकरारापासून इस्रायलला असलेला धोका अधोरेखित केला. त्याला अमेरिकेकडून व ई३ देशांकडून प्रतिसाद मिळाल्याचे सांगून पंतप्रधान येर लॅपिड यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

अणुकराराच्या मुद्यावरदरम्यान, इराणच्या थापेबाजीमुळेच हा अणुकरार पुढे सरकला होता, अशी टीका इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्नी यांनी केला. इराण आपला अणुकार्यक्रम इस्रायलचे अस्तित्त्व पुसून टाकण्यासाठीच राबवित होता. अमेरिका व युरोपिय देशांनी अणुकरार केला असता, तर आंतरराष्ट्रीय वैधतेच्या आधारे इराणने आपला हा अणुकार्यक्रम पुढे नेला असता, असा दावा बनी यांनी केला. मात्र हा अणुकरार झाला तरीही इस्रायलच्या मोसादच्या कारवायांपासून इराणचा हा अणुकार्यक्रम सुरक्षित राहू शकला नसता, असा सणसणीत इशारा मोसादच्या प्रमुखांनी दिला आहे. एका विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मोसादचे प्रमुख बर्नी यांनी हा इशारा दिला.

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतच्या सत्याकडे इस्रायल डोळेझाक करू शकत नाही. त्यामुळे अणुकरार झाल्यानंतरही इस्रायलच्या कारवायांपासून इराणचा अणुकार्यक्रम सुरक्षित राहू शकणार नाही, असे बर्नी यांनी यावेळी बजावले. तसेच इस्रायल व इस्रायलींवर थेट किंवा आपल्या हस्तकांमार्फत चढविलेल्या हल्ल्यांचे वेदनादायी परिणाम अखेरीस आपल्यालाच सहन करावे लागणार आहेत, याचे भान इराणच्या नेत्यांना असलेच पाहिजे. इस्रायल काही इराणच्या छुप्या हस्तकांना लक्ष्य करणार नाही, तर त्यांना शस्त्रे पुरवणाऱ्यांना आणि सूचना देणाऱ्या इराणलाच इस्रायल लक्ष्य करील, असे हमासच्या प्रमुखांनी जाहीर करून टाकले. त्यांची ही विधाने साऱ्या आखाती क्षेत्रात इस्रायल व इराण तसेच इराणसंलग्न गटांमध्ये घनघोर संघर्ष पेट घेणार असल्याचे संकेत देत आहेत.

leave a reply