पोर्तुगालच्या लष्करी नेटवर्कवरील सायबरहल्ल्यात नाटोची गोपनीय माहिती गहाळ

Portugal's military networkब्रुसेल्स – नाटोचा सदस्य देश असलेल्या पोर्तुगालच्या सर्वोच्च लष्करी यंत्रणेच्या ‘कॉम्प्युटर नेटवर्क्स’वर मोठा सायबरहल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यात नाटोशी संबंधित असलेली गोपनीय माहिती गहाळ झाली आहे. ही माहिती इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचेही समोर आले. गेल्या दोन महिन्यात नाटोशी संबंधित माहितीवर हल्ला चढवून ती उघड होण्याची ही दुसरी घटना ठरली आहे. गेल्या महिन्यात, युरोपातील आघाडीची संरक्षणकंपनी असणाऱ्या ‘एमबीडीए सिस्टिम्स’च्या क्षेपणास्त्रयंत्रणेची माहिती हॅकर्सनी चोरल्याचे उघड झाले होते.

पोर्तुगालमधील आघाडीच्या दैनिकांनी सायबरहल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानुसार, गेले अनेक महिने पोर्तुगालमधील सर्वोच्च लष्करी यंत्रणा असणाऱ्या ‘ईएमजीएफए’च्या कॉम्प्युटर नेटवर्क्सवर ‘बोट्स’च्या सहाय्याने हल्ले सुरू होते. या हल्ल्यांमध्ये नाटोच्या हालचाली व यंत्रणांशी संबंधित माहिती गहाळ करण्यात आली. ही माहिती इंटरनेटवर विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमेरिकी यंत्रणांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या दूतावासाच्या माध्यमातून पोर्तुगाल सरकारपर्यंत ही माहिती पोहोचविली. त्यानंतर सदर घटनेचा तपास सुरू झाल्याचे पोर्तुगालकडून सांगण्यात आले.

नाटोने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली असून पोर्तुगालचे अधिकारी येत्या काही दिवसात नाटोच्या मुख्यालयाला भेट देतील, असे सांगण्यात येते.

leave a reply