लेबेनॉनच्या रॉकेटहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलचे हवाई हल्ले

जेरुसलेम/बैरुत – लेबेनॉनमधून सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या रॉकेटहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने हवाईहल्ले चढविले आहेत. इस्रायल-लेबेनॉन सीमेजवळील महमुदिया भागानजिक हे हवाईहल्ले करण्यात आले आहेत. गुरुवारी करण्यात आलेले रॉकेटहल्ले पॅलेस्टिनी गटांकडून करण्यात आले असून इस्रायलचा हवाईहल्ला योग्य संदेश देण्यासाठी होता, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला.

लेबेनॉनच्या रॉकेटहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलचे हवाई हल्लेबुधवारी लेबेनॉनमधून इस्रायलवर तीन रॉकेट हल्ले झाले होते. या हल्ल्यांविरोधात कारवाई करताना इस्रायली लष्कराने तोफगोळे डागले होते. इस्रायली लष्कराच्या या कारवाईनंतर गुरुवारी पहाटे इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ले चढविण्यात आले. सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या या हल्ल्यांनंतर इस्रायली लढाऊ विमानांनी लेबेनॉनमध्ये हवाईहल्ले चढविले. ‘रॉकेटस्चा मारा करण्यात आलेल्या जागा व सुविधांवर हल्ले करण्यात आले. यापूर्वी ज्या भागातून हल्ले झाले होते अशा जागांनाही लक्ष्य करण्यात आले’, अशी माहिती इस्रायली हवाईदलाने दिली.

लेबेनॉनच्या रॉकेटहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलचे हवाई हल्ले‘गुरुवारी चढविलेले हवाईहल्ले रॉकेटहल्ले चढविणार्‍या गटांना योग्य संदेश देण्यासाठी होते. इस्रायल याहून मोठी कारवाई करु शकतो, पण त्याची गरज पडणार नाही अशी आशा आहे’, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले. रॉकेट हल्ल्यांमागे पॅलेस्टिनी गटांचा हात असल्याचा संशयही इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. 2014 सालानंतर इस्रायलने लेबेनॉनमध्ये हवाईहल्ले चढविण्याची पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.

लेबेनॉनच्या रॉकेटहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलचे हवाई हल्लेलेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मायकल एऑन यांनी इस्रायलच्या हवाईहल्ल्यांवर नाराजी व्यक्त केली. ‘लेबेनॉनसंदर्भात इस्रायलचे आक्रमक इरादे अधिकच तीव्र झाल्याचे हवाईहल्ल्यांमधून दिसून येते. हे हल्ले दक्षिण लेबेनॉनच्या सुरक्षा व स्थैर्याला थेट धोका आहे. इस्रायलच्या हल्ल्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांचे उल्लंघन केले आहे’, अशी टीका राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी केली आहे. रॉकेट हल्ले तसेच इस्रायलच्या हवाईहल्ल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

लेबेनॉन सध्या राजकीयदृष्ट्या अस्थिर असून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे लेबेनॉन अधिकच धोकादायक बनला असून त्याचा इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा इस्रायल सरकारसह पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी दिला होता. त्याचवेळी लेबेनॉनमधून होणार्‍या प्रत्येक हल्ल्यासाठी लेबेनॉन सरकारच जबाबदार असेल, असेही इस्रायलकडून बजावण्यात आले आहे.

leave a reply