सिरियाच्या राजधानीजवळ इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

- दोन सिरियन जवान गंभीररित्या जखमी

दमास्कस – सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवाद्यांमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इस्रायलने सिरियात नवे हल्ले चढविले. राजधानी दमास्कसच्या परिसरात इस्रायलने चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमध्ये दोन सिरियन जवान गंभीररित्या जखमी झाले. तसेच वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलने या हल्ल्यात इराणच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याला लक्ष्य केल्याचा दावा ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटना करीत आहेत. दरम्यान, महिन्याभरात इस्रायलने सिरियात चढविलेला हा पाचवा हल्ला ठरतो.

सिरियाच्या राजधानीजवळ इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले - दोन सिरियन जवान गंभीररित्या जखमीबुधवारी मध्यरात्रीनंतर राजधानी दमास्कसमध्ये कानठळ्या बसविणारे स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे स्थानिकांनी म्हटले आहे. इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या भागातून क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्यात आले असून काही क्षेपणास्त्रे भेदण्यात आपली हवाई सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरल्याचा दावा सिरियाने केला.

पण दमास्कसच्या नेमक्या कोणत्या भागात क्षेपणास्त्रे कोसळली, तसेच या हल्ल्याची माहिती देण्याचे सिरियन सरकारने टाळले. मात्र दमास्कसच्या दक्षिणेकडील ‘कफ्र सौसा’ या भागात क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. यामध्ये दोन सिरियन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनेने दिली. त्यामुळे हल्ला झाला त्याठिकाणी सिरियन जवान तैनात होते, याकडे ही संघटना लक्ष वेधत आहेत. यावरुन लष्करी तळ किंवा शस्त्रास्त्रांच्या गोदामाला इस्रायलने लक्ष्य केल्याची शक्यता या संघटनेने व्यक्त केली. सिरियन लष्कर, माध्यमे व मानवाधिकार संघटना करीत असलेल्या दाव्यांवर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्याच आठवड्यात सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ले झाले होते. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचे आरोप सिरियाने केले होते. यामध्ये 19 जणांचा बळी गेला होता. इराणसंलग्न संघटनेचे दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला होता. तसेच अलेप्पो विमानतळाच्या आवारात असणारे इराणचे भुयारी गोदाम या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले होते. यामध्ये क्षेपणास्त्रांचा मोठा साठा होता. त्यामुळे या हल्ल्यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

सिरियाच्या राजधानीजवळ इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले - दोन सिरियन जवान गंभीररित्या जखमीया हल्ल्यात सिरिया तसेच इराणने आपले कुठलेही नुकसान झाले नसल्याचे म्हटले होते. पण सदर हल्ल्यानंतर दोन दिवसांसाठी अलेप्पो विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये जबर नुकसान झाल्याच्या बातम्यांना दुजोरा मिळत असल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता.

गेल्या सात वर्षांहून अधिक काळ सिरियात हवाई हल्ले सुरू असून यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियन सरकार करीत आहे. इस्रायलने या हल्ल्यांची जाहीरपणे कबुली दिलेली नाही. मात्र सिरियाला इस्रायलवरील हल्ल्यांचे ‘लाँचिंग पॅड’ बनू देणार नाही, असा इशारा इस्रायलने याआधी दिला होता. तसेच सिरियातील दहशतवादविरोधी कारवाई आणि मानवतावादी सहाय्याच्या आडून इराण शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. सिरियात हल्ले चढविण्यासाठी कोणाच्याही परवानगीची वाट पाहणार नसल्याचे इस्रायलने ठणकावले होते. अशा परिस्थितीत सिरियात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरिया करीत आहे.

leave a reply