परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची अमेरिकेच्या विशेषदूतांशी चर्चा

नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कतारमध्ये अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक विशेषदूत झाल्मे खलिलझाद यांच्याशी चर्चा केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती उघड केली. कुवैतच्या दौर्‍यावर जाताना परराष्ट्रमंंत्री जयशंकर कतारमध्ये थांबले होते. त्यावेळी दोहा येथे ही भेट झाल्याचे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने याचे तपशील उघड केले. सध्या अफगाणिस्तानात तालिबानने जोरदार लष्करी मुसंडी मारली असून लवकरच तालिबान या देशाचा ताबा घेईल, अशी चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत भारत व तालिबानमध्ये चर्चा सुरू असल्याचे दावे केले जातात. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा कतार-कुवैत दौरा यासाठीच होता, अशी चिंता पाकिस्तानच्या सामरिक विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती.

एकेकाळी पाकिस्तानच्या सूचनेनुसार कारवाया करणारी दहशतवादी संघटना अशी तालिबानची ओळख होती. पण आता तालिबान भारतासाठी अनुकूल बनली असून पाकिस्तानसाठी ही बाब धोकादायक ठरते, असे या दशाचे सामरिक विश्‍लेषक सांगत आहेत. भारताने तालिबानशी चर्चा सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट दुजोरा दिला नव्हता. पण अफगाणिस्तानातील सर्वच गटांशी भारताचा संवाद सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. अशा परिस्थितीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कुवैतचा दौरा केला व या दौर्‍यादरम्यान ते दोन वेळा कतारमध्ये थांबले होते. यावेळी कतारच्या दोहा येथे त्यांनी अमेरिकेचे विशेषदूत झाल्मे खलिलजाद यांच्याशी चर्चा केली.

शुक्रवारी याबाबतची महिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली. पण पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याच्या आधीच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौर्‍याच्या बातम्या दिल्या होत्या. परराष्ट्रमंत्री जयशंकर कतारमध्ये थांबले होते आणि कतारमध्येच तालिबानचे राजनैतिक कार्यालय आहे, याकडे पाकिस्तानी विश्‍लेषक लक्ष वेधत होते. त्याच दरम्यान भारताची तालिबानशी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा योगायोगाचा भाग नाही, असे पाकिस्तानी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारत तालिबानशी चर्चा करून आपल्या देशाची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची भीती पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

आधीच्या काळात तालिबानच्या बळावर अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजविण्याचे व अफगाणींच्या भूमीचा वापर करून भारतात दहशतवाद माजविण्याचे कारस्थान पाकिस्तानने आखले होते. पण आता तालिबानवरील पाकिस्तानचे नियंत्रण सुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्कर भेदरलेल्या स्थितीत आहे व पुढच्या काळात तालिबानपासूनच पाकिस्तानला फार मोठा धोका संभवतो, असे दावे पत्रकार करू लागले आहेत. तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानात हवाई तळ व पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेला नाही म्हणण्याची धमक पाकिस्तानकडे उरलेली नाही. अशा स्थितीत तालिबान पाकिस्तानला धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही. त्यासाठी भारत तालिबानला साथ देणार असेल, तर आपल्या देशाची धडगत नाही, असे पाकिस्तानचे पत्रकार उघडपणे बोलू लागले आहेत.

leave a reply