वुहान लॅब लीकची माहिती पुरविणार्‍या चीनच्या गुप्तचर अधिकार्‍याने अमेरिकेत आश्रय घेतला – पाश्‍चिमात्य माध्यमांचा दावा

लंडन – चीनच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे उपमंत्री असलेल्या ‘डॉंग जिंगवुई’ यांनी अमेरिकेत आश्रय घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. जिंगवुई यांनी चीनच्या वुहान प्रयोगशाळेत कोरोनाचा उगम झाल्याची (वुहान लॅब लीक) माहिती अमेरिकेपर्यंत पोहोचविली होती. त्यामुळे जिंगवुई यांचा अमेरिकेतील आश्रय हा चीनला बसलेला फार मोठा हादरा ठरतो, असे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. तर ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या चिनी राजवटीशी निगडीत असलेल्या वर्तमानपत्राने मात्र जिंगवुई चीनमध्येच असल्याचे दावे केले. जिंगवुई यांनी परदेशी हेरांना साथ देणार्‍या चीनमधील हस्तकांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला आहे.

कोरोनाच्या उगमस्थानाबाबतचा तपास करण्याचे आदेश देऊन ९० दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या गुप्तचर विभागाला दिले आहेत. या दरम्यान, चीनच्या वुहान प्रयोगशाळेतच कोरोनाच्या विषाणूची निर्मिती झाली व इथूनच हा विषाणू सर्वत्र पसरल्याचे उघड करणारी माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येत आहे. त्यातच अमेरिकेत आश्रय घेतलेल्या चिनी संशोधकांनी हा विषाणू चीननेच पसरविल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे जाहीर केले होते. याचे परिणाम दिसू लागले असून आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात गेले आहे. नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या जी७च्या बैठकीतही याचे प्रतिबिंब उमटले होते. या बैठकीत कोरोनाच्या उगमाचा तपास नव्याने करण्याची मागणी उचलून धरण्यात आली व यासाठी चीनने सहाय्य करावे, अशी अपेक्षा जी७च्या सदस्यदेशांनी व्यक्त केली होती.

याचे दडपण चीनला जाणवू लागले आहे. अशा परिस्थितीत डॉंग जिंगवुई यांच्याबाबतची बातमी समोर आली आहे. ‘गुवांबु’ नावाने चीनच्या हेरखात्यामध्ये ओळखल्या जाणआर्‍या डॉंग जिंगवुई यांच्याकडे परदेशी हेरांना रोखण्याचे काम सोपविण्यात आले होते. चांगल्या कामगिरीमुळे त्यांना बढती देऊन चीनच्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’चे (एमएसएस) उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र इतके महत्त्वाच्या पदावर असलेल्या जिंगवुई यांनीच ‘वुहान लॅब लीक’चे तपशील अमेरिकेला पुरविले होते. पाश्‍चिमात्य माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये तसे दावे करण्यात आले आहेत.

यामुळे आत्तापर्यंत वुहान लॅब लीक प्रकरणात सौम्य भूमिका स्वीकारणार्‍या बायडेन प्रशासनाकडून पुढच्या काळात चीनबाबत कठोर धोरण स्वीकारले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. म्हणनच जिंगवुई यांच्यासंदर्भात आलेल्या या बातमीला असाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. विशेषथः जिंगवुई यांनी वुहान लॅब लीकच्या दाव्याला दुजोरा देणारे पुरावे अथवा माहिती जगजाहीर केली, तर अमेरिकेसह सर्वच प्रमुख देश चीनच्या विरोधात खडे ठाकतील. त्यामुळे जिंगवुई यांच्याबाबत आलेल्या या बातमीकडे निरिक्षकांचे डोळे लागले आहेत.

डॉंग जिंगवुई हॉंगकॉंगमधून आपली लेक डॉंग यांग हिला घेऊन फेब्रुवारी महिन्यातच अमेरिकेत पोहोचल्याचे या बातमीत सांगण्यात आले आहे. हे उघड झाल्यानंतर चीनची धावपळ सुरू झाली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व चीनचे प्रतिनिधी यांग जेईची यांच्यात अस्लाका येथे पार पडलेल्या चर्चेत, जेईची यांनी जिंगवुुईला चीनकडे सोपवा, अशी मागणी केली होती. पण अमेरिकेने त्याला नकार दिला. यामुळे दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद झाले होते, असे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र चीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी निगडीत असलेल्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वर्तमानपत्राने जिंगवुई यांच्याबाबत आलेल्या या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

डॉंग जिंगवुई चीनमध्येच आहेत. इतकेच नाही तर जिंगवुई यांनी चीनमध्ये परदेशी हेरांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्या चिनी हस्तकांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक बनल्याचे म्हटले आहे. तसेच ही कारवाई करण्याचे आदेश जिंगवुई यांनी दिल्याची माहिती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे.

leave a reply