जपान व चीनमध्ये चार वर्षानंतर पहिला ‘सिक्युरिटी डायलॉग’

टोकिओ – जपानची राजधानी टोकिओमध्ये बुधवारी जपान व चीनमध्ये ‘सिक्युरिटी डायलॉग’ पार पडला. चार वर्षानंतर पहिल्यांदाच दोन देशांमध्ये सुरक्षविषयक मुद्यांवर द्विपक्षीय बैठक झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीदरम्यान जपानने ईस्ट चायना सीमधील चीनच्या कारवाया, रशियाबरोबरील लष्करी सराव, ‘स्पाय बलून्स’ व तैवानचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. तर चीनने जपानच्या वाढत्या संरक्षणखर्चाकडे बोट दाखवून शीतयुद्धकालिन मानसिकतेचा आरोप केल्याचे समोर आले आहे.

२०१९ साली बीजिंगमध्ये जपान व चीन यांच्यात सुरक्षाविषयक बैठक झाली होती. त्यानंतर कोरोनाची साथ व चीनच्या विस्तारवादी कारवायांमुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये ‘सिक्युरिटी डायलॉग’ झाला नव्हता. मात्र चीनमुळे पॅसिफिक क्षेत्रात संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन जपानने तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे मानले जाते. जपान व चीनमध्ये संबंध सुधारण्यासाठी अनेक संधी असल्या तरी चिंताजनक मुद्देही आहेत, अशी प्रतिक्रिया जपानचे परराष्ट्र उपमंत्री शिगेओ यामादा यांनी दिली. तर चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सून वायडाँग यांनी जपान संरक्षणविषयक धोरण अधिक आक्रमक करीत असल्याचा ठपका ठेवला.

leave a reply