चीनकडून ‘फँटम स्पेस स्ट्राईक’ तंत्रज्ञानाची चाचणी

बीजिंग – प्रतिस्पर्धी देशावर अणुहल्ला चढविण्यापूर्वी त्या देशाच्या ‘मिसाईल डिफेन्स’ अर्थात हवाई सुरक्षा यंत्रणांना चकमा देणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी केल्याचा दावा चीनने केला आहे. ‘फँटम स्पेस स्ट्राईक’ असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शत्रूच्या हवाईसुरक्षा यंत्रणांना चकवून हल्ले चढविता येतील, असे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या संशोधकांनी सांगितले.

चीनच्या संरक्षण विभागाने ‘कॉम्प्युटर सिम्युलेशन’च्या सहाय्याने चाचणी घेतल्याची माहिती दिली. चाचणीदरम्यान, एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात तीन छोटी अंतराळयाने जोडण्यात आली. क्षेपणास्त्राने अंतराळात प्रवेश केल्यावर ही तिन्ही अंतराळयाने त्यापासून वेगळी झाली. या यानांमधून हवाईसुरक्षा यंत्रणेतील रडार्सना एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला होत असल्याचे ‘फेक सिग्नल्स’ पाठविण्यात आले. त्याला अनुसरून हवाईसुरक्षा यंत्रणांनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी ‘इंटरसेप्टर्स’ डागली. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ लवकरच या तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात चाचणी घेणार असून त्याची तयारी झाल्याचे सांगण्यात येते. ‘फँटम स्पेस स्ट्राईक’च्या सहाय्याने शत्रूच्या हवाईसुरक्षा यंत्रणेची क्षमता घटवून नियोजित लक्ष्यांवर अधिक क्षेपणास्त्र हल्ले करता येतील, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. हाँगकाँगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने हे वृत्त दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन अंतराळक्षेत्रासाठी घातक तंत्रज्ञान विकसित करीत असल्याचे आरोप अमेरिका व इतर देशांकडून होत आहेत. नव्या तंत्रज्ञानासंदर्भातील दावे त्याला दुजोरा देणारे ठरतात.

leave a reply