जपानने चीनवर आक्रमण करण्याची क्षमता प्राप्त करावी

- जपानच्या लष्करी विश्‍लेषकाचे आवाहन

टोकिओ – ‘चीनचा धोका अधिकाधिक गंभीर होऊ लागला आहे. असे असताना जपानने देखील चीनवर आक्रमण करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी वेगाने पावले उचलावी’, असे आवाहन जपानचे लष्करी विश्‍लेषक मसाफूमा इदा यांनी केले. यासाठी जपानने चीनच्या किनारपट्टीवरील तळ व बंदरांवर हल्ला चढविण्याच्या क्षमतेत वाढ करावी, असे इदा यांनी सुचविले आहे.

अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज्’ या अभ्यासगटाने एका ऑनलाईन फोरमचे आयोजन केले होते. यामध्ये जपानच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिफेन्स स्टडिज्’ या अभ्यासगटातील ‘अमेरिका, युरोप अँड रशिया डिव्हिजन’चे प्रमुख इदा यांचा सहभाग होता. यावेळी इदा यांनी चीनपासून वाढत असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली.

यासाठी चीनने आपल्या तटरक्षकदलांच्या अधिकारांमध्ये केलेली भयावह वाढ, सेंकाकू द्विपसमुहांच्या हद्दीतील चीनची वाढती घुसखोरी आणि जपानच्या ओकिनावा बेटाजवळून चीनच्या लिओनिंग विमानवाहू युद्धनौकेने घातलेली गस्त यांची आठवण इदा यांनी यावेळी करून दिली.

चीनची या क्षेत्रातील सागरी आक्रमकता अधिकाधिक वाढत असून चीनचा सामना करण्यासाठी जपानला अमेरिकेच्या सहाय्याची फार आवश्यकता असल्याचे इदा यांनी स्पष्ट केले. चीनच्या लष्करी आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी जपान व अमेरिकेतील सहकार्य महत्त्वाचे ठरू शकते, असे इदा म्हणाले. यासाठी जपान आणि अमेरिकेतील युद्धसरावांची संख्या व क्षमता वाढविणे, ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील गस्त, गोपनीय माहितींचे आदानप्रदान या क्षेत्रातही सहकार्य वाढविले पाहिजे, असे इदा यांनी सुचविले. याशिवाय जपानने आपल्या हवाई सामर्थ्यातही वाढ करावी, असे इदा यावेळी म्हणाले.

गेल्या काही वर्षांमध्ये जपानने आपल्या बचावात्मक संरक्षण धोरणात मोठे बदल केले आहेत. पण चीनचा धोका लक्षात घेता जपानला अधिक आक्रमक लष्करी सामर्थ्य प्राप्त करणे अत्यंत गरजेचे आहे, असा दावा इदा यांनी केला आहे. चीनच्या किनारपट्टीवरील लष्करी, नौदल तळ आणि बंदरांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेले हवाई सामर्थ्य जपानने प्राप्त करावे, असे इदा यांनी सुचविले आहे.

leave a reply