चीनबरोबरचा वाद विकोपाला गेल्यास फिलिपाईन्स अमेरिकेचे सहाय्य घेईल

- फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा

मनिला – ‘वेस्ट फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, फिलिपाईन्स मित्रदेश अमेरिकेचे सहाय्य घेऊ शकतो. उभय देशांमध्ये झालेल्या लष्करी कराराप्रमाणे हे सहकार्य बंधनकारकही ठरते’, अशा शब्दात फिलिपाईन्सने चीनला इशारा दिला. चीनच्या दोनशेहून अधिक मिलिशिया जहाजांनी आपल्या सागरी क्षेत्रात केलेल्या घुसखोरीमुळे संतापलेल्या फिलिपाईन्सने चीनला हा सूचक संदेश दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रूझवेल्ट’ आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली आहे.

चीनच्या २२० हून अधिक जहाजांनी फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली आहे. या घटनेला महिना लोटला असून फिलिपाईन्सने वारंवार आवाहन करूनही चीनच्या या जहाजांनी या क्षेत्रातून माघार घेतलेली नाही. लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया अर्थात सशस्त्र दल या जहाजांचे नेतृत्व करीत असल्याचा ठपका फिलिपाईन्सने ठेवला होता. तसेच या जहाजांवर पाळत ठेवण्यासाठी फिलिपाईन्सने सागरी तसेच हवाई गस्त देखील सुरू केली. आपल्या जहाजांच्या तैनातीचे समर्थन करणार्‍या चीनला फिलिपाईन्सने इशारा दिला होता. चिनी जहाजांची घुसखोरी कायम राहिली तर नको असलेले वैर निर्माण होईल, असे फिलिपाईन्सने बजावले होते.

पण यानंतरही चीनच्या जहाजांची येथील तैनाती कायम आहे. तसेच चीनने या सागरी क्षेत्रात उत्खनन सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहे. फिलिपाईन्स दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रात चीनने उत्खनन करून कृत्रिम बांधकाम सुरू केल्याचे बोलले जाते. याशिवाय चीनच्या गस्तीनौकांची गस्त देखील सुरू झाली आहे. चीन अधिकार सांगत असलेल्या सागरी क्षेत्रात परदेशी जहाजांनी घुसखोरी केली तर त्यावर गोळीबार करण्याची परवानगी चीनने आपल्या गस्तीजहाजांना दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. त्यामुळे चीनच्या गस्तीजहाजांची येथील तैनाती येथील तणाव वाढविणारी ठरत आहे.

अशा परिस्थितीत, फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने सदर सागरी क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे सहाय्य घेण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या ‘म्युच्युअल डिफेन्स ट्रिटी’नुसार फिलिपाईन्स आपल्या सहकारी देशाकडून लष्करी सहाय्य घेऊ शकतो, असा सूचक संदेश फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते अर्सेनियो अँडोलॉंग यांनी दिला. फिलिपाईन्सच्या या इशार्‍याच्या काही तासा आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका याच सागरी क्षेत्रात दाखल झाली असून लवकरच ती फिलिपाईन्समध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply