जपानने अणुप्रकल्पाजवळ इंटरसेप्टरची चाचणी केली

इंटरसेप्टरची चाचणीटोकिओ – जपानच्या ‘सेल्फ डिफेन्स फोर्स’ने फुकूई क्षेत्रात पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणेतील ‘पॅक-थ्री’ इंटरसेप्टरची यशस्वी चाचणी केली. ओई अणुप्रकल्पापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तळावर ही चाचणी पार पडल्याचे जपानच्या लष्कराने जाहीर केले. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांपासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानने सदर इंटरसेप्टर प्रक्षेपित केल्याचा दावा केला जातो.

जपानच्या लष्कराकडे पॅट्रियॉट ही हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. फार आधी जपानने अमेरिकेकडून खरेदी केलेल्या या हवाई सुरक्षा यंत्रणेचे अद्ययावतीकरण सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी पॅक-थ्रीमध्ये देखील मोठे बदल केल्याच्या बातम्या आल्या होत्या. नेमक्या त्याचवेळी उत्तर कोरियाने लघू, मध्यम व आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा सपाटा लावला होता. अशा परिस्थितीत, सोमवारी नागाईहामा किनारपट्टीच्या क्षेत्रात जपानने इंटरसेप्टरची चाचणी केली.

जपानच्या लष्करातील ३५ जवानांनी अवघ्या २० मिनिटांमध्ये या इंटरसेप्टरची उभारणी, तैनाती व चाचणी घेतली. याद्वारे उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आपण सज्ज असल्याचे जपानने दाखवून दिले आहे.

leave a reply