कम्युनिस्ट राजवटीच्या कारवाईनंतरही चीनच्या ग्वांगझोऊमध्ये निदर्शने भडकली

- कोरोनाच्या नव्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या उत्पादनक्षेत्रात मोठी घसरण

ग्वांगझोऊमध्येबीजिंग/ग्वांगझोऊ – कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांविरोधात चीनमध्ये सुरू झालेली निदर्शने रोखण्यात कम्युनिस्ट पार्टी अपयशी ठरल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात सुरक्षायंत्रणा तैनात करून कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही बुधवारी चीनमधील आघाडीचे शहर असणाऱ्या ग्वांगझोऊमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यावेळी निदर्शकांनी सुरक्षायंत्रणांवर दगडफेक केल्याने निदर्शनांना हिंसक वळण लागले. ग्वांगझोऊबरोबरच शांघायच्या काही भागांमध्ये सामान्य नागरिक व सुरक्षायंत्रणांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या नव्या उद्रेकाचा चीनच्या उत्पादनक्षेत्राला मोठा फटका बसला असून ‘पीएमआय’ ४८पर्यंत खाली घसरला आहे.

ग्वांगझोऊमध्येकाही आठवड्यांपूर्वी चीनच्या ग्वांगझोऊ शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने त्याची मुदत वाढविण्यात येत असून निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून यापूर्वीही जनता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले होते. नागरिकांनी सुरक्षादलांशी हुज्जत घालत रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स हटविण्याचा प्रयत्नही केला होता. उरुम्किमधील घटनेनंतर पुन्हा एकदा ग्वांगझोऊमधील नागरिक आक्रमक झाले असून गेले पाच दिवस सातत्याने निदर्शने सुरू आहेत.

ग्वांगझोऊमध्येचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अतिरिक्त सुरक्षादले तैनात करून कारवाई सुरू केल्यानंतरही ग्वांगझोऊमधील निदर्शक रस्त्यावर उतरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी अनेक ठिकाणी उभारलेले अडथळे हटविले असून मोडतोडही केल्याचे दिसून आले. सुरक्षादलांनी कारवाईला सुरुवात करताच निदर्शकांनी दगडफेक करण्यासही सुरुवात केल्याचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स समोर येत आहे. सुरक्षादलांनी अनेक निदर्शकांना ताब्यात घेतल्यानंतरही शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याचे दिसून येत आहेत. ग्वांगझोऊबरोबरच चीनचे आर्थिक केंद्र मानले जाणाऱ्या शांघायमध्येही सामान्य नागरिक व सुरक्षादलांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांवरून झटापट झाल्याचे सांगण्यात येते.

सलग पाच दिवसांनंतरही निदर्शने थांबली नसल्याने चीनने आता लष्कर तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दावे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. शांघायजवळच्या भागांमध्ये लष्करी रणगाडे प्रवास करीत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे चीनची कम्युनिस्ट राजवट आंदोलन चिरडण्यासाठी टोकाला जाण्याची तयारी करीत असल्याचे मानले जाते. चीनच्या ‘सेंट्रल पॉलिटिकल ॲण्ड लीगल अफेअर्स कमिशन’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, घुसखोरी व घातपाताचे प्रयत्न उधळण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चीनच्या उत्पादनक्षेत्रावर कोरोना उद्रेकांचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. उत्पादनक्षेत्रातील घडामोडींचे निदर्शक असणाऱ्या ‘द पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स’मध्ये(पीएमआय) ४८पर्यंत घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात हा निर्देशांक ४९.२ होता. पीएमआय ५०च्या खाली असणे मंदीसदृश स्थिती मानली जाते.

leave a reply