टोकिओ – चीन तसेच उत्तर कोरियाकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जपान अमेरिकेकडून 400 टॉमाहॉक क्रूझ् क्षेपणास्त्रांची खरेदी करणार आहे. पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जपानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला ही माहिती दिली. जपान या क्षेपणास्त्रांची करीत असलेली खरेदी चीनची बेचैनी वाढविणारी ठरू शकते.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी संरक्षणखर्चाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. जपानच्या संरक्षणदलांसाठी जाहीर केलेल्या खर्चाव्यतिरिक्त जवळपास दीड अब्ज डॉलर्सची तरतूद क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी असल्याचे जपानने म्हटले होते. ही खरेदी सुरू वर्षातच पूर्ण होणार असल्याचे सांगून जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सदर क्षेपणास्त्रांची तातडीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले होते.
देशाच्या सुरक्षेला संभवणाऱ्या धोक्याविरोधात या क्षेपणास्त्रांची खरेदी करीत असल्याचे जपानने म्हटले होते. जपानच्या या घोषणेवर त्यावेळी चीनने संताप व्यक्त केला होता. या क्षेपणास्त्रांची खरेदी करून जपान या क्षेत्रातील तणावात वाढ करीत असल्याची टीका चीनने केली होती. अशा परिस्थितीत, जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेकडून 400 टॉमाहॉक क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा निर्णय घेऊन चीनच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे दाखवून दिले आहे.