जपान तैवानजवळच्या बेटावर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करणार

japan taiwan missile defenceकॅम्प फोस्टर – तैवानपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या योनागूनी या दुर्गम बेटावर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करणार असल्याची घोषणा जपानच्या संरक्षण मंत्रालयाने केली. या क्षेत्रातील जपानच्या नान्सी बेटांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचे जपानने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने नान्सी बेटांना लक्ष्य करणारा सराव केला होता. त्यानंतर ही तैनाती करून जपानने चीनला उत्तर दिले आहे.

japan basesआठवड्यापूर्वी चीनच्या लाओनिंग या विमानवाहू युद्धनौकेने विनाशिका व पाणबुड्यांच्या ताफ्यासह तैवानच्या सागरी हद्दीपासून काही अंतरावर मोठ्या सरावाचे आयोजन केले होते. तैवानपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या जपानच्या नान्सी बेटाला लक्ष्य करणारा चीनने सराव केल्याचे उघड झाले होते. जपानचे प्रशासन असलेले नान्सी बेट हे ओकिनावा द्वीपसमुहाचा भाग आहे. त्यामुळे चीनचा हा सराव जपान व तैवानसह ओकिनावामध्ये तैनात अमेरिकेसाठी देखील आव्हान ठरते.

चीनच्या या युद्धसरावावर प्र्रतिक्रिया देण्याऐवजी जपानने थेट योनागूनी बेटावर जमिनीवरुन हवेत मारा करणारी हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येईल. तैवानच्या किनारपट्टीपासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर ही तैनाती केली जाईल, असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ताकेशी आयोकी यांनी सांगितले. पुढच्या वर्षी ही तैनाती पूर्ण होणार असल्याचे आयोकी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे महासचिव हिरोशिगे सेको यांनी बुधवारी तैवानला भेट दिली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सेको यांचे स्वागत करून जपान व तैवानमधील संरक्षण सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. दोन्ही देशांनी चीनच्याविरोधात एकत्र यावे, अशी मागणी राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी केली. जपानी नेत्याच्या या भेटीवर चीनने आगपाखड केली आहे. तैवानप्रकरणी जपान काही गंभीर हालचाली करीत असल्याचा संताप चीनने व्यक्त केला. जपानच्या नेत्याची ही भेट प्रक्षोभक असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी जपानचे नेते अशा कारवाया करीत असल्याचा आरोप चीनने केला.

leave a reply