अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील आघाडीच्या देशांकडून चीनच्या प्रवाशांवर निर्बंध लादण्याच्या हालचाली

चीनच्या ‘रिओपनिंग’ धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीकेची झोड

Chinese passengersवॉशिंग्टन/रोम/बीजिंग – चीनने ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करून नागरिकांवरील निर्बंध हटविल्यानंतर कोरोनाच्या साथीने मोठा हाहाकार उडविल्याची माहिती समोर येत आहे. या साथीबाबत योग्य माहिती देण्याऐवजी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने पुन्हा एकदा लपवाछपवीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात धास्तीचे वातावरण असून अनेक आघाडीच्या देशांनी चिनी प्रवाशांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसह जपान, इटली व भारत या आघाडीच्या देशांनी हवाईमार्गे येणाऱ्या चिनी प्रवाशांना कोरोनासंदर्भातील चाचणी सक्तीची केली आहे.

covid-19काही आठवड्यांपूर्वी चीनने कोरोनाची साथ रोखण्यासाठी लादलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनमधील बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात चीनमध्ये 24 तासांच्या अवधीत कोरोनाचे तब्बल 3 कोटी, 70 लाख रुग्ण आढळल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. त्यानंतरही चीनमधील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून हॉस्पिटल्स व दफनभूमींमध्ये मोठ्या रांगा लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत.

Giorgia_Meloni_Conferenzaया पार्श्वभूमीवर जगातील आघाडीच्या देशांनी हवाईमार्गे येणाऱ्या चिनी प्रवाशांवर चाचणी व इतर निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका, जपान, इटली, भारत यासारख्या देशांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. इटलीत काही दिवसांपूर्वी आलेल्या दोन विमानांमधील 50 टक्के चिनी प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिआ मेलोनी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून चिनी प्रवाशांना कोरोनाची चाचणी सक्तीची केली आहे. मेलोनी यांनी युरोपिय महासंघालाही यासंदर्भात पत्र लिहिले असून महासंघानेही चिनी प्रवाशांबाबत तातडीने कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोनाची साथ सुरू होत असतानाही चीनने त्याबाबत लपवाछपवी करून खरी आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे नाकारले होते. जगभरातील देश निर्बंध लागू करीत असतान चीनच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर टीकास्त्र सोडले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी प्रवासी तसेच विमानांवर टाकलेल्या बंदीवर कडाडून टीका झाली होती. मात्र ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्या निर्णयाची नंतर युरोपिय देशांनीही पुनरावृत्ती केली होती.

दरम्यान, चीनमधील या वाढत्या कोरोनामुळे शेजारी देशांमध्येही रुग्णसंख्या व कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे उघड झाले आहे. जपानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची नवी लाट आली असून रुग्णसंख्या तसेच बळींची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मंगळवारी जपानमध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली.

leave a reply