जपानकडून चीनच्या धोक्याविरोधात ‘थ्री-इन-वन’ क्षेपणास्त्राची निर्मिती

टोकिओ – चीनच्या वाढत्या हवाई सामर्थ्याला उत्तर म्हणून जपान ‘थ्री-इन-वन’ बहुउद्देशीय क्रूझ क्षेपणास्त्राची निर्मिती करीत आहे. या एकाच क्षेपणास्त्रामध्ये टेहळणी तसेच रडार जॅमिंग अर्थात शत्रूची रडार यंत्रणा ठप्प करणे आणि हल्ले चढविण्याची क्षमता असणार आहे. जपानच्या सरकारने आपल्या नव्या संरक्षण खर्चात या क्षेपणास्त्रासाठी विशेष तरतूद केल्याचे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे.

आठवड्यापूर्वी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी ३२० अब्ज डॉलर्सचा संरक्षण खर्च जाहीर केला होता. यामध्ये दोन ते तीन हजार किलोमीटर पर्यंत मारा करू शकणाऱ्या क्रूझ, बॅलेस्टिक तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी जपानने पहिल्यांदाच परवानगी दिली होती. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता चीन तसेच उत्तर कोरियापर्यंत असेल, असा दावा जपानच्या माध्यमांनी केला होता.

जपानच्या नव्या संरक्षण धोरणामध्ये स्पष्टपणे चीनपासून आपल्या सुरक्षेला धोरणात्मक आव्हान असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर कोरियाकडून जपानच्या सुरक्षेला गंभीर आणि त्वरीत धोका असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच आपल्या संरक्षण खर्चात एवढी मोठी तरतूद करणाऱ्या जपानच्या या घोषणेमुळे चीन अस्वस्थ झाला होता. जपानमुळे या क्षेत्रात शस्त्रस्पर्धा भडकेल, अशी टीका चीनने केली होती. अशा परिस्थितीत जपानने ‘थ्री-इन-वन’ क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी हालचाली सुरू केल्याच्या बातमीने चीनची झोप उडू शकते, असे जपानी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सदर क्षेपणास्त्र शत्रूच्या ठिकाणांची टेहळणी करून टार्गेट अर्थात लक्ष्य निश्चित करणार आहे. या माहितीच्या आधारावर क्षेपणास्त्राद्वारे शत्रूची रडार यंत्रणा, सेंसर्स ठप्प करण्यात येईल आणि त्यानंतर शत्रूच्या निर्धारित लक्ष्यावर निशाणा साधला जाईल, असा दावा केला जातो. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता एक हजार किलोमीटर पर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply