होर्मुझच्या आखातापासून सुएझ कालव्यापर्यंत इराण हल्ले चढवू शकेल

- रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धमकी

तेहरान – इराणच्या हितसंबंधांना धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झालाच तर इराण होर्मुझचे आखात किंवा बाब अल-मंदेबच नाही तर सुएझ कालव्यापर्यंत हल्ले चढवू शकतो, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख हुसेन सलामी यांनी दिला. होर्मुझच्या आखातापासून सुएझ कालव्यापर्यंत होणारी इंधनाची व व्यापारी वाहतूक रोखून जगाला वेठीस धरण्याची क्षमता आपल्याकडे आहे, याची जाणीव इराण या धमकीद्वारे करून देत आहे. इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याबाबत गंभीर इशारे देत असताना, इराणने आपल्या लष्करी अधिकाऱ्यांद्वारे दिलेली ही धमकी खळबळ माजविणारी ठरू शकते.

ही धमकी देत असतानाच, इस्रायलविरोधी कारवाईसाठी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनांना आर्टिफिशल इंटेलिजन्सनी सज्ज ड्रोन्स पुरविण्याची घोषणा सलामी यांनी केली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी पर्शियन आखातात नवा युद्धसराव आयोजित केला होता. या युद्धसरावामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या नौदलाने क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रे, ड्रोन्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. ॲम्फिबियस युद्धनौकांच्या सहाय्याने क्षेपणास्त्रे डागून इराणच्या ड्रोन्सनी ती भेदल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. या सरावादरम्यान मेजर जनरल सलामी यांनी इस्रायल व अमेरिकेसह इतर देशांनाही वेठीस धरणारा इशारा दिला.

आत्तापर्यंत होर्मुझच्या आखात किंवा पर्शियन आखाताची कोंडी करण्याची धमकी इराणने अमेरिका व युरोपिय देशांना दिली होती. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सकडे असलेल्या गस्तीनौका, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या सहाय्याने इराणने होर्मुझच्या आखातावर दहशत निर्माण केल्याची टीका आखाती देशांनी केली होती. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी पर्शियन आखात तसेच रेड सीच्या क्षेत्रात सौदी अरेबिया, युएई व इस्रायलच्या जहाजांना ड्रोन्सनी लक्ष्य केले होते. सदर ड्रोन्स इराणी बनावटीचे असल्याचा आरोप सौदीने केला होता. पण आत्ता इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने थेट सुएझ कालव्यापर्यंत ड्रोन्सचे हल्ले चढविण्याची दिलेली धमकी धडकी भरविणारी असल्याचा दावा केला जातो.

होर्मुझचे आखात इराणच्या ताब्यात असून जगातील इंधनाचा २० टक्के पुरवठा एकट्या होर्मुझच्या आखातातून होतो. तर आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या इजिप्तमधील सुएझ कालव्यातून जगातील जवळपास १० टक्के इंधनाची वाहतूक होते. पर्शियन आखात व होर्मुझच्या आखातातून वर्ग होणारे इंधन तसेच व्यापारी जहाजांसाठी सुएझ कालव्याचा वापर होतो. त्यामुळे कुठल्याही कारणास्तव सुएझ कालवा बाधित झाला तर प्रति दिन आखातातून युरोपसाठी जाणारे १० लाख बॅरल्स कच्चे तेलाची कोंडी होऊ शकते, असा दावा आंतरराष्ट्रीय अभ्यासगट करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युरोपिय देश इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर निर्बंध लादण्याच्या, दहशतवादी संघटना घोषित करून काळ्या यादीत टाकण्याचे इशारे देत आहेत. युरोपिय महासंघाच्या संसदेत यासंबंधी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यापासून युरोपिय देश इंधनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत, होर्मुझचे आखात ते सुएझ कालव्यापर्यंत हल्ले चढविण्याची धमकी देऊन इराणने युरोपिय देशांचे इंधनाचे संकट अधिक तीव्र करण्याचा संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply