क्वाडचे आर्थिक नाटोमध्ये रुपांतर करून चीनला धक्का द्या

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा सल्ला

वॉशिंग्टन – विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड संघटनेने योग्य दिशेने पावले उचलणे अत्यावश्यक आहे. क्वाडचे रुपांतर ‘इकॉनॉमिक नाटो’ अर्थात आर्थिक आघाडीवर भक्कम संघटन असलेल्या नाटोमध्ये झाले तर त्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढेल, असे ‘जियान्ली यांग’ या चीनच्या माजी लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. एका वर्तमानपत्रातील लेखात यांग यांनी प्रबळ आर्थिक संघटनाद्वारे चीनला रोखता येऊ शकेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

क्वाडचे आर्थिक नाटोमध्ये रुपांतर करून चीनला धक्का द्या - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा सल्लाअमेरिकेत आश्रय घेतलेल्या जियान्ली यांग हे चीनवर टीका करणारे परखड विश्‍लेषक मानले जातात. ‘फोरम फॉर रिलिजस फ्रिडम-युरोप’ या संघटनेचे अध्यक्ष एरॉन र्‍होड्स यांच्यासह पाश्‍चिमात्य वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात जियान्ली यांग यांनी क्वाडला महत्त्वाचा सल्ला दिला. भारत, अमेरिका, जपान व फ्रान्स या देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी क्वाडद्वारे एकजूट केली आहे. याची चिंता चीनला वाटू लागली आहे. पण सध्या तरी क्वाड ही अनौपचारिक पातळीवर सहकार्य असलेली संघटना असून अजूनही ही संघटना पूर्णपणे सक्रीय बनलेली नाही.

तसेच क्वाडचे रुपांतर क्वाड प्लसमध्ये करण्याची तयारी झाली असून यात व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया व न्यूझीलंड या देशांचा समावेश होऊ शकतो, असे दावे केले जात होते. ही बाब चीनला चांगलीच खटकली असून क्वाडचा विस्तार होणार नाही व इतर देश यामध्ये सहभागी होणार नाहीत, यासाठी चीन धडपडत आहे, याकडे जियान्ली यांग यांनी लक्ष वेधले. दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि कोरियन क्षेत्रातील देश क्वाडमध्ये सहभागी होणार नाही, यासाठी चीन विशेष संवेदनशीलता दाखवित आहे, असा दावा यांग यांनी केला.

क्वाडचे आर्थिक नाटोमध्ये रुपांतर करून चीनला धक्का द्या - आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा सल्लाकाही दिवसांपूर्वीच बांगलादेशने क्वाडमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर याचे विपरित परिणाम होतील, अशी धमकी चीनने बांगलादेशला दिली होती. त्यामुळे जियान्ली व र्‍होड्स यांच्या लेखात मांडण्यात आलेला हा निष्कर्ष तंतोतंत खरा असल्याचे स्पष्ट होत आहे. क्वाडचा विस्तार रोखण्याबरोबरच चीन क्वाडचे प्रमुख सदस्य असलेल्या भारत व अमेरिकेमध्ये विसंवाद वाढविण्यासाठी योजनाबद्धरित्या प्रयत्न करीत असल्याचा दावा जियान्ली यांनी केला. भारतात कोरोनाची लाट आलेली असताना, अमेरिकेने भारताला लसींसाठी लागणारा कच्चा माल पुरविण्यास नकार दिला होता, ही बाब चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने उचलून धरली होती, यावर जियान्ली व र्‍होड्स यांनी बोट ठेवले.

अशा परिस्थितीत क्वाडचे संघटन अधिक भक्कम व प्रभावी करण्यासाठी योग्य दिशेने पावले टाकणे अत्यावश्यक ठरते. क्वाडचे आर्थिक सहकार्य मजबूत करून आर्थिक पातळीवर नाटोसारख्या प्रबळ संघटना उभी करण्याचे ध्येय क्वाड देशांनी आपल्यासमोर ठेवावे, असा सल्ला जियान्ली यांग व एरॉन र्‍होड्स यांनी आपल्या लेखातून दिला. ऑस्ट्रेलियाबरोबरील चीनचे संबंध विकोपाला गेल्यानंतर, चीनने ऑस्ट्रेलियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. सध्या दोन्ही देशांचे आर्थिक पातळीवर युद्धच सुरू असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत क्वाडचे आर्थिक सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरेल व याचा फार मोठा फटका चीनला बसेल, असा विश्‍वास जियान्ली यांग यांनी या लेखातून व्यक्त केला आहे.

leave a reply