कुरापतखोर चीनला रोखण्यासाठी भारताने आक्रमक व्हावे

- माजी राजनैतिक व लष्करी अधिकार्‍यांची मागणी

नवी दिल्ली – एलएसीवर पुन्हा चीनच्या कुरापतखोर कारवाया टाळायच्या असतील, तर भारताने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यायला हवी, असा सल्ला भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी दिला आहे. चीनच्या विरोधात राजनैतिक पातळीवर आरडाओरडा करून किंवा आंतरराष्ट्रीय आघाड्यांचा चीनवर परिणाम होणार नाही. त्यापेक्षा भारताने एलएसीवरील आपले सामर्थ्य वाढवावे, असे मेनन यांनी म्हटले आहे. चीन पुन्हा घुसखोरी करील, हे लक्षात घेऊन तशी संधीच चीनला मिळणार नाही, यासाठी भारतीय लष्कराने आक्रमक डावपेचांचा वापर करावा, अशी मागणी माजी लष्करी अधिकारी करीत आहेत.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवरील पँगॉंग सरोवर क्षेत्रात भारतीय लष्कराने जशी आक्रमक कारवाई करून चीनला धक्का दिला होता, तशीच कारवाई आत्ताही अपेक्षित आहे. त्याखेरीज भारताला एलएसीवर चीनच्या कुरापतखोर कारवाया रोखता येणार नाहीत, असे शिवशंकर मेनन म्हणाले. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना मेनन यांनी हा सल्ला दिला. भारतीय लष्कराचे मेजर (निवृत्त) गौरव आर्या यांनीही भारतीय लष्कराने आत्तापासूनच चीनच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, अशी मागणी केली आहे. २०१७ साली डोकलाममध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न करून पाहिला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराला रोखले होते. त्यावेळी चीनच्या लष्कराला दणका देणे भारतीय सैन्यासाठी सहजशक्य होते. पण भारताने तसे केले नाही. म्हणूनच चीनने लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करण्याची हिंमत दाखविली, असा दावा मेजर आर्या यांनी केला.कुरापतखोर चीनला रोखण्यासाठी भारताने आक्रमक व्हावे - माजी राजनैतिक व लष्करी अधिकार्‍यांची मागणी

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करू पाहणार्‍या चीनच्या लष्कराला भारतीय सैन्याने जबरदस्त प्रत्युत्तर दिले. गलवानच्या खोर्‍यात चीनच्या लष्कराने भारतापेक्षाही अधिक संख्येने आपले जवान गमावले होते. पण हुकूमशाही व्यवस्था असलेला हा देश आपल्या विरोधात येणार्‍या बातम्या सहजपणे दडपू शकतो. लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात मात्र बातम्यांवर तसे नियंत्रण ठेवले जात नाही याचा लाभ चीनने घेतला आणि या लडाखच्या एलएसीवर आपली सरशी झाल्याचा आभास निर्माण केला, असे गौरव आर्या यांनी सोशल मीडियावरील एका मुलाखतीत म्हटले आहे. चीन प्रचारयुद्धाचा मोठ्या कल्पकतेने वापर करून त्याद्वारे भारतावर दडपण वाढवित आहे, याकडेही मेजर गौरव आर्या यांनी लक्ष वेधले.

म्हणूनच पुढच्या काळात चीनच्या कुरापती थांबवायच्या असतील, तर भारतानेच एलएसीवर अधिक आक्रमकता दाखवायला हवी. भारतीय लष्करानेच चीनच्या हद्दीत शिरण्याची गरज आहे. प्रचारयुद्धाचा वापर चीनकडून केला जातो, हे लक्षात घेऊन भारताने हीच बाब चीनवर उलटविण्याची तयारी ठेवायला हवी. त्याचवेळी चीनमधील लोकशाहीवादी चळवळींना पाठिंबा द्यायला हवा. कारण भारत किंवा अमेरिका यांच्या लष्करापेक्षाही चीन लोकशाहीलाच अधिक प्रमाणात घाबरतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय सोशल मीडियावर चीनमध्ये बंदी आहे, ही बाब देखील मेजर गौरव आर्या यांनी लक्षात आणून दिली.

चीनला दणका देण्याची पुरेपूर क्षमता भारतीय सैन्याकडे आहे. चीनलाही याची जाणीव आहे. पण भारताची आत्तापर्यंतची भूमिका संयमी आणि बचावात्मक राहिलेली आहे, याचा फायदा चीनकडून घेतला जातो. पुढच्या काळात चीनला याचा फायदा मिळू देणार नाही, असा निर्णय भारताने घेतला, तर चीनला आपल्या कुरापतींची किंमत मोजावी लागेल, याची जाणीव होईल. त्यानंतरच चीनच्या वर्तनात सुधारणा होईल. अन्यथा चीन भारताला वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत राहिल. सध्या लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करू पाहणारा चीन, पुढच्या काळात अधिक तयारीने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर घुसखोरी करू शकेल. म्हणूनच हे टाळायचे असेल, तर आक्रमक डावपेचांचा वापर करण्यावाचून पर्याय नाही, असे गौरव आर्या यांनी बजावले आहे.

leave a reply