काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा; तालिबानला भारताशी उत्तम संबंध हवे आहेत

- तालिबानच्या हक्कानी नेटवर्कच्या नेत्याचा दावा

नवी दिल्ली – कतारमधील भारतीय राजदूतांबरोबरील भेटीत तालिबानचा नेता स्तानेकझई याने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. तसेच अफगाणिस्तानातील भारतीय आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षेची ग्वाही देखील स्तानेकझई याने दिली. याला एक दिवस उलटत नाही तोच, तालिबानमधील भारतविरोधी गट असलेल्या हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी याने आम्हाला भारताशी उत्तम संबंध हवे असल्याचे सांगून आपल्या संघटनेचा काश्‍मीरशी काही संबंध नसेल, असे म्हटले आहे. याद्वारे तालिबान आपण पाकिस्तानच्या तालावर नाचणार नाही, असा संदेश भारताला देऊ पाहत असल्याचे दिसते.

कतारमध्ये भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचा नेता स्तानेकझई याची भेट घेतली. तालिबानने या भेटीची मागणी केली होती व स्तनेकझई हा कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. भारत व तालिबानमधील ही अधिकृत पातळीवर झालेल्या या पहिल्याच चर्चेची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली. भारत या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा देश आहे व तालिबानला भारताबरोबर उत्तम संबंध अपेक्षित असल्याचे स्तानेकझई याने म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानला भारताबरोबर व्यापार हवा असून यासाठी पाकिस्तानने मार्ग खुला करावा, अशी मागणी स्तनेकझई याने केली. ही मागणी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानातून येत आहे.

अफगाणिस्तानात अश्रफ गनी यांचे सरकार सत्तेवर असताना, अफगाणिस्तानातून भारतात व्यापारी वाहतूक केली जात होती. यासाठी पाकिस्तानने मार्ग खुला ठेवला. पण भारतातून अफगाणिस्तानात उत्पादने पाठविण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. यासाठी भारताने इराणचे छाबहार बंदर विकसित करून इराणमार्फत अफगाणिस्तानसाठी व्यापारी वाहतुकीचा मार्ग तयार केला होता. अशा परिस्थितीत तालिबानने पाकिस्तानकडे भारताबरोबरील व्यापारासाठी मार्ग खुला करण्याची मागणी केल्याचे दिसत आहे.

इतकेच नाही तर इराणच्या छाबहार बंदर प्रकल्पाला तालिबानचा पाठिंबा असेल, असे स्तनेकझई याने जाहीर केले आहे. यानंतर आता तालिबानमधील प्रमुख गट असलेल्या हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी यानेही आपल्याला भारताबरोबर उत्तम संबंध अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. याआधी अफगाणिस्तानात भारताच्या दूतावास तसेच हितसंबंधांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हक्कानी गटाचा हात होता. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयच्या इशाऱ्याने हक्कानी नेटवर्क भारतविरोधी कारवाया करीत असल्याचे उघड झाले होते.

अशा परिस्थितीत अनस हक्कानी याने भारताबाबत केलेली विधाने पाकिस्तानसाठी फार मोठा हादरा ठरू शकतो. मुख्य म्हणजे काश्‍मीर प्रश्‍नाशी आपला संबंध नसेल, असे अनस हक्कानी याने जाहीर केले. काश्‍मीर हा आमच्या अधिकारकक्षेत येणारा भाग नाही. दुसऱ्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे आमचे धोरण नाही. त्यामुळे काश्‍मीरच्या प्रश्‍नात आम्ही लुडबूड करणार नाही, कारण तसे करणे आमच्या धोरणाविरोधात जाणारे ठरेल, असे सांगून अनस हक्कानी यानेही भारताला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिबानमधले आत्तापर्यंत कट्टर भारतविरोधी मानले जाणारे गट देखील आता बदण्याचे संकेत देत असल्याचे दिसते.

तालिबान यापुढे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणार नाही, हा संदेश तालिबानच्या विविध गटांकडून दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला तालिबान आणि पाकिस्तानमधील मतभेत वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत. असे असूनही भारताने तालिबानबाबत अत्यंत सावध भूमिका स्वीकारून नेमकी पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

leave a reply