चीन व उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान किशिदा दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर दाखल

सेऊल/टोकिओ – तब्बल १२ वर्षाच्या कालावधीनंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर दाखल झाले. चीनच्या कारवाया व उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांचा हा दौरा लक्ष वेधून घेणारा ठरतो. या दौऱ्यादरम्यान झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध व भेटीगाठी सुरळीत झाल्याची घोषणा दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली. त्याचवेळी हा दौरा संरक्षण व व्यापारी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणारा असून त्याचा लाभ दोन्ही देशांमधील जनतेला मिळेल, अशी ग्वाही जपान व दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी दिली.

चीन व उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान किशिदा दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर दाखलजपान व दक्षिण कोरियामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील काही गोष्टींवरून जबरदस्त तणाव आहे. महायुद्धाच्या काळात जपानने कोरियावर ताबा मिळवून कोरियन नागरिकांचा वापर गुलामांसारखा केला होता. त्याबद्दल जपानने माफी मागावी व जपानी कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी दक्षिण कोरियाची मागणी आहे. २०१८ साली दक्षिण कोरियातील न्यायालयाने दोन जपानी कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, असा आदेशही दिला होता. तर १९६५ साली दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील वादाचे निराकरण झाल्याचा जपानचा दावा आहे. जपान व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या यापूर्वीच्या सरकारांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव सातत्याने चिघळत राहिला आहे. मात्र गेल्या काही महिन्यात चीन व उत्तर कोरियाच्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांनी मार्च महिन्यात जपानचा दौरा करीत सकारात्मक संबंधांसाठी पुढाकार घेतला होता.

त्यानंतर दोन देशांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली होती. गेल्या दोन महिन्यात जपान व दक्षिण कोरियात दोन उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. यात ‘मिलिटरी इंटेलिजन्स शेअरिंग’सह तंत्रज्ञान, ऊर्जा व सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली होती. या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवातही झाली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांचा कोरिया दौरा त्याचाच भाग ठरतो. पंतप्रधान किशिदा यांनी आपल्या दौऱ्यात दुसऱ्या महायुद्धात जपानकडून दक्षिण कोरियाच्या नागरिकांवर झालेल्या अत्याचारांबद्दल तीव्र शोक व्यक्त करून आपण दक्षिण कोरियन जनतेच्या दुःखात सहभागी असल्याचे उद्गार काढले. जपानी पंतप्रधानांचे हे वक्तव्य दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

गेल्या काही वर्षात चीनच्या पॅसिफिक क्षेत्रातील विस्तारवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या क्षेत्रातील वर्चस्वासाठी चीनकडून घुसखोरीसह इतर अनेक मार्गांचा वापर करण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाने आपल्या अणुकार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या सुरू असून त्यात अण्वस्त्रांचाही समावेश आहे. या चाचण्या व उत्तर कोरियाच्या राजवटीकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे कोरियन क्षेत्रातील तणाव सध्या चांगलाच चिघळला आहे. चीन व उत्तर कोरियाची ही वाढती आक्रमकता रोखण्यासाठी अमेरिकेने या क्षेत्रात आघाडी तयार करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

जपान व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश आघाडीचा मुख्य भाग असल्याने त्यांच्यातील संबंध सुरळीत असणे अमेरिकेसाठी महत्त्वाचे ठरते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता जपानच्या पंतप्रधानांचा दक्षिण कोरिया दौरा महत्त्वाचा ठरतो.

हिंदी English

 

leave a reply