कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले; मुंबईत विक्रमी पाऊस

- राज्यात 'एनडीआरएफ'ची १६ पथके तैनात

मुंबई – एका दिवसात झालेला ३३२ एमएम पाऊस आणि ११० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी मुंबईत दाणादाण उडवून दिली. मुंबईतील या पावसाने ४६ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Mumbai-Rainगेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या १४३ घटनांची नोंद करण्यात आली. पावसामुळे जे. जे रुग्णालयातही तळमजल्यावर पाणी साचले होते. तसेच शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात पाणी साचल्याने डॉक्टरांची धावपळ झाली. कांदिवली येथील भूस्खलनाचा घटनेनंतर दक्षिण मुंबईतही पेडर रोड येथे भूस्खलन झाले.

बुधवारी दोन लोकलमधे जवळपास २९० प्रवासी अडकले होते. एनडीआरएफ आणि आरपीएफच्या टीमने रात्री या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याचे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने या सर्वासाठी रेल्वे स्थानक आणि पालिका शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली होती.

Mumbai-Rainबोरिवली आणि नवी मुंबईत काही ठिकाणी ११५ मिमी पाऊस कोसळला. तर ठाणे, सानपाडा, बेलापूर, नेरूळ आणि चेंबूर येथे ११५ ते २०० मिमी, माझगाव आणि कुलाबा येथे २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. सलग तिसऱ्या दिवशी रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवेला फटका बसल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पहिल्या पाच दिवसातच झाला आहे.

एकीकडे पावसाने दाणादाण उडवलेली असली तरी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ हजार ४११ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडल्याने तलावांतील जलसाठा पाच लाख ३९ हजार ३०७ दशलक्ष लिटरवर पोहोचला. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोडकसागर २८ मि.मी.,तानसामध्ये ६७ मि.मी., मध्य वैतरणामध्ये १४ मि.मी., तुळशीमध्ये ७४ मि.मी.,आणि विहारमध्ये ५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

मराठवाड्यातील प्रमुख सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येतील जायकवाडी परिसरात आतापर्यंत ५३२ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून बुधवारी सकाळी जायकवाडीची पाणीपातळी ४६१.००१ मीटर नोंदवण्यात आली. माजलगाव प्रकल्पात ६३.५३ टक्के पाणी आहे. माजलगाव प्रकल्पात ४३०.२२० मीटर पाण्याची नोंद करण्यात आली. मराठवाड्यातील सात प्रकल्पात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.

Mumbai-Rainगोव्यात पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक मिरज मार्गे वळविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ६ इंच पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरातही पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील तब्बल १८९ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील ९३ तालुक्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद करण्यात आल्याचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.

leave a reply