जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यातील गुरेझ भागातील तुलई येथील किशनगंगा नदीत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. याच भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याचे भारतीय लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा शस्त्रसाठा पाहिल्यास दहशतवादी मोठ्या घातपाताचा तयारीत असल्याचे दिसत आहे. हे दहशतवादी नदी ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सुरक्षदलांनी सांगितले.

शस्त्रसाठा

शनिवारी नदीत दहशतवाद्यांचे मृतदेह आढल्यानंतर या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली. ६ एके- ४७च्या मॅगझिन, २७० राऊंड्स, चिनी पिस्तूलच्या ६५ राऊंड्स, हॅन्ड ग्रेनेड, दोन एमटीआर कोरडेक्स, १५ डिटोनेटर, १ ब्लॅक रेडिओ व जीपीएस गार्मीनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव समीर अहमद दार असून तो दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील डोगरीपोरा भागातील रहिवासी आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, तो मे २०१८ पासून बेपत्ता होता. नियंत्रणरेषा ओलांडून तो हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला होता. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात येत आहे. ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांना बोलावण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, कोरोनाचा फैलाव होत असताना त्याच्या फायदा घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी सहाय्य करत आहे. त्यासाठी सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. मात्र सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात येत आहेत. गुरुवारी बारामुल्लामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यावर्षी सुरक्षादलाच्या कारवाईत १५० हुन अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

leave a reply