पीओकेमध्ये पाकिस्तान आणि चीनविरोधात जोरदार निदर्शने

मुझफ्फराबाद – चीन निलम आणि झेलम नद्यांवर उभारत असलेल्या धरणांविरोधात पाकिस्तानव्याप्त काश्मीरची (पीओके) जनता रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी जनता मशाली पेटवून निदर्शकांनी चीन आणि पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा दिल्या. इथे विकास प्रकल्प राबवताना, स्थानिकांचे हित विचारात घेतले जात नाही, अशी पीओकेच्या जनतेची तक्रार आहे. पीओकेच नाही तर, सिंध, बलोचिस्तान प्रांतातही ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) विरोधात असाच असंतोष व्यक्त होत आहे.

China-POKकाही महिन्यांपूर्वी पाकिस्तान आणि चीनमध्ये पीओकेमध्ये आझाद पट्टान आणि कोहला जलविद्युत प्रकल्प उभारण्यावर करार झाला. पीओकेच्या निलम आणि झेलम नद्यांवर हे प्रकल्प उभारले जात आहेत. यापैकी आझाद पट्टान हा ७०७ मेगावॅटचा प्रकल्प असून तो ‘सीपीईसी’चा भाग आहे. चीनच्या कंपनीने या प्रकल्पामध्ये १.५४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर कोहला जलविद्युत प्रकल्प इस्लामाबादपासून ९० किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पाकिस्तानसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. चीनच्या थ्री जॉर्जेस कंपनीने या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली असून २०२६ सालापर्यंत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

मात्र, या जलविद्युत प्रकल्पांसाठी निलम आणि झेलम नद्यांचे पाणी वळविले जाणार असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. म्हणूनच आमच्या नद्या वाहू द्या आणि आम्हाला जगू द्या, असा कडक संदेश स्थानिकांनी निदर्शने चीन आणि पाकिस्तानला दिला आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून पीओकेमध्ये हस्तक्षेप करणार्‍या चीनला हा हस्तक्षेप रोखण्यासाठी, ‘दर्या बचाओ मुझफ्फराबाद बचाओ’ या समितीने पीओकेमध्ये पाकिस्तान आणि चीनविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. याला स्थानिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जोपर्यंत पाकिस्तान हे प्रकल्प रद्द करीत नाही, चीन येथून माघार घेत नाही, तोपर्यंत ही निदर्शने सुरुच राहतील, असा इशारा या समितीने दिला आहे. ‘निलम झेलम बहने दो, हमे जिंदा रहने दो’, या घोषणाबाजीने पीओके’मधील शहरे हादरुन दिली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

दरम्यान, ‘सीपीईसी’मध्ये भष्ट्राचार झाल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. पाकिस्तानच्या लष्कराचा त्यात समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यात पीओकेमधली निदर्शनेही वाढत आहे. पण पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर भारतद्वेषाचा वापर करुन पाकिस्तानी जनतेचे यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

leave a reply