चीनचे उदाहरण देऊन भारताच्या संरक्षणमंत्र्यांची अमेरिकेला समज

अमेरिकेला समजवॉशिंग्टन – ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात भारतीय सैनिकांनी नक्की काय केले, ते मी उघड करू शकत नाही. सरकारने सैन्याला कोणते आदेश दिले होते, याचीही माहिती मला देता येणार नाही. पण भारताला कुणी छेडले, तर त्याला सोडून दिले जाणार नाही, हा संदेश (चीनला) देण्यात आलेला आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करताना स्पष्ट केले. याबरोबरच एका देशाबरोबरील संबंधांचा दुसर्‍या देशाबरोबरील संबंधांवर परिणाम होऊ देत नाही, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी रशियाबरोबरील सहकार्यावरून भारतावर दडपण टाकू पाहणार्‍या अमेरिकेला समज दिली आहे.

युक्रेनचे युद्ध सुरू असताना, रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधनतेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारताने रशियाचा हा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यावर अमेरिकेने भारताला धमक्या देण्याचे सत्र सुरू केले. नुकत्याच पार पडलेल्या टू प्लस टू चर्चेतही अमेरिकेने भारताला रशियाबरोबरील सहकार्यावरून इशारे दिले होते. भारताच्या अनेक पट इंधनाची खरेदी करणार्‍या युरोपिय देशांबाबत अमेरिकेने अशी कठोर भूमिका स्वीकारलेली नाही. खुद्द अमेरिकाच रशियाकडून अजूनही इंधनाची खरेदी करीत आहे. या दुटप्पीपणावर भारताने बोट ठेवले आहे. तसेच इंधनाच्या पाठोपाठ भारत रशियाकडून आता कोळसा खरेदी करणार असल्याच्याही बातम्या येत आहेत.

तसेच अमेरिका व युरोपिय देशांनी आर्थिक नाकेबंदी केल्याने रशियन बाजारपेठेत निर्माण झालेली संधी साधण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. अमेरिकेने निर्बंधांच्या धमक्या दिल्या, तरी त्याचा भारतावर परिणाम होणार नाही, याची जाणीव याद्वारे भारत अमेरिकेला करून देत आहे. त्याचवेळी अमेरिकेनेही भारताच्या विरोधात प्रचारमोहीम सुरू केल्याचे दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना, पुन्हा एकदा भारताची भूमिका स्पष्ट केली. यासाठी त्यांनी चीनचा दाखला दिला.

गलवान खोर्‍यात झालेल्या भारत व चीनच्या लष्कराचा संघर्षात, भारतीय सैनिकांनी जबरदस्त पराक्रम गाजविला होता. पण काही कारणांमुळे तची माहिती सार्वजनिक करता येणार नाही व त्यासंदर्भातील सरकारच्या आदेशांबद्दलही सांगता येणार नाही, असे राजनाथ सिंग म्हणाले. पण भारताला छेडल्यानंतर, भारत सोडणार नाही, हा संदेश या संघर्षातून देण्यात आल्याचे सूचक उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले.

अमेरिकेने भारतावर निर्बंध लादण्याची तयारी केली असून मानवाधिकारांचा मुद्यावर भारताला घेरण्याचे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले होते. त्याला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. आता संरक्षणमंत्र्यांनीही भारताच्या हितसंबंधांना धक्का दिल्यानंतर, अमेरिकेला याचे प्रत्युत्तर मिळेल, याची जाणीव करून दिली. एका देशाबरोबर भारताचे उत्तम संबंध प्रस्थापित होत आहेत, याचा अर्थ दुसर्‍या देशाबरोबर भारताचे संबंध बिघडतील, असा होत नाही. भारताने अशा स्वरुपाचे एकांगी परराष्ट्र धोरण कधीही मान्य केले नव्हते व भारताचा त्यावर विश्‍वास नाही. दोन्ही देशांना लाभ मिळेल, अशा स्वरुपाच्या परराष्ट्र धोरणावर भारत विश्‍वास ठेवतो. असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले.

भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलली असून भारताची प्रतिष्ठा वाढत चालली आहे. येत्या काही वर्षात, जगातील कुठलीही शक्ती भारताला तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यापासून रोखू शकणार नाही, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

leave a reply