केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या हस्ते ‘एसएनए डॅशबोर्ड`चे लोकार्पण

नवी दिल्ली – आधार कार्ड, कोविन ॲप आणि युपीआय पेमेंट सिस्टीमप्रमाणेच ‘एसएनए डॅशबोर्ड` कारभारात फार मोठे बदल घडवून आणणारी बाब ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. मंगळवारी ‘एसएनए (सिंगल नोडल अकाऊंट) डॅशबोर्ड`चा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला आहे.

हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आयकॉनिक विक`चा भाग असल्याचे सांगितले जाते. ‘एसएनए डॅशबोर्ड` हा 2021 साली हाती घेण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा भाग होता. केंद्र सरकारद्वारे राज्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी (सेंट्रली स्पॉन्सर्ड स्किम्स-सीएसएस) निधी पुरविणे, त्याचे वितरण आणि त्यावरील देखरेख, यासाठी ‘एसएनए डॅशबोर्ड` विकसित करण्यात आले आहे.

‘केंद्राकडून राज्यांना मिळालेला निधी, राज्यांकडून जिल्ह्यांना पुरविला जाणारा निधी; त्याच्याही पलिकडे जाऊन जिल्हा पातळीवरून गावांना पुरविल्या जाणाऱ्या निधीची माहिती उपलब्ध झाली, तर कारभारात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांना फार मोठे यश मिळेल, असा विश्‍वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. याने केंद्र सरकारकडून विविध योजनांवर खर्च केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुपयाचा अधिक चांगल्या रितीने वापर होईल, असे सांगून अर्थमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

पुढच्या काळात केंद्र सरकारच्या राज्यातील प्रत्येक योजनेसाठी ‘एसएनए`चा वापर राज्य सरकारांकडून केला जाईल. यामुळे केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी दिलेला निधी राज्य सरकार तसेच राज्यांच्या यंत्रणांना अधिक सुलभतेने पुरविता येईल, ही बाबही सीतारामन यांनी यावेळी लक्षात आणून दिली.

गेल्या आठ महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदार देशातील गुंतवणूक काढून घेत असल्याची बाब समोर आली होती. मात्र कोरोनाची साथ आल्यानंतरच्या काळात व्यक्तीगत पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या देशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. या देशी गुंतवणूकदारांमुळे शेअर बाजारांना बसणारे धक्के पचविणे सोपे जात आहे, असा दावा सीतारामन यांनी केला.

leave a reply