देशांतर्गत धोरणांना मिळालेले अपयश व घसरत्या लोकप्रियतेमुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासनात नैराश्याची भावना

- अमेरिकेतील माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेसमोर असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यात आलेले अपयश व राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची घसरती लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर बायडेन व प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची झाल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. गेल्या काही महिन्यात अमेरिकेसमोर असलेल्या महागाई, इंधन दरवाढीचा भडका, कोरोनाची साथ, ‘बेबी फॉर्म्युला शॉर्टेज’, वाढती गुन्हेगारी व हिंसाचार या समस्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना आपली धोरणे राबविणारे विधेयके मंजूर करून घेण्यातही यश मिळालेले नाही. त्यामुळे प्रशासनासह डेमोक्रॅट पक्षातही अस्वस्थता वाढल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.

गेल्या आठवड्याभरात अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांमधून बायडेन प्रशासनातील विसंवाद व नैराश्याबाबत एकापाठोपाठ एक लेख प्रसिद्ध झाले आहेत. यात ‘पीपल’ या आघाडीच्या साप्ताहिकासह ‘एनबीसी न्यूज’ व ‘सीएनएन’ या वृत्तवाहिन्या तसेच ‘पॉलिटिको’ या आघाडीच्या वेबसाईटचा समावेश आहे. ‘बायडेन इज फ्रस्ट्रेटेड’, ‘डीपर डिस्फंक्शन अमंग व्हाईट हाऊस’, ‘व्हाईट हाऊस ॲड्रिफ्ट’ अशा नावांनी प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह प्रशासनातील निकटवर्तिय व अधिकाऱ्यांमध्ये आलेल्या नैराश्याचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरुवातीचे महिने वगळता नंतरच्या काळात ज्यो बायडेन यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला बायडेन यांच्यावर अमेरिकेतील तब्बल 70 टक्के जनता नाखूष असल्याचे काही सर्वेक्षणांमधून समोर आले. ही घसरण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील नाराजीलाही मागे टाकणारी ठरली आहे. लोकप्रियतेतील घसरणीमुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन निराश झाले असून ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करीत आहेत.

मात्र राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे बायडेन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत चालल्याची तक्रार समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यक्रमांची सरधोपट हाताळणी, माध्यमांशी थेट मुलाखतींना देण्यात येणारा नकार, जनतेशी तसेच मतदारांशी संपर्क वाढविण्यात येणारे अपयश व नव्या कल्पनांवर बंदी यामुळे प्रशासनात निरुत्साहाचे वातावरण आहे. प्रशासनातील अनेक अधिकारी मोठ्या प्रमाणात राजीनामे देत असल्याकडेही माध्यमांनी लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षभरात बायडेन प्रशासनातील 20 कृष्णवर्णिय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बायडेन प्रशासनातील अंतर्गत वर्तुळात याचा उल्लेख ‘ब्लॅक्झिट’ असा होण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची घसरती लोकप्रियता व प्रशासनातील नैराश्य यामुळे सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातही अस्वस्थता आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांना अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधी राहिला आहे. या कालावधीत बायडेन यांच्या लोकप्रियतेत वाढ होण्याची कोणतीही शक्यता समोर दिसत नाही. त्यामुळे मध्यावधीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांनी स्वतःला बायडेन यांच्यापासून दूर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तर काही उमेदवारांनी बायडेन यांच्या कार्यपद्धतीत तसेच प्रशासनात मोठे बदल करण्याची आग्रही मागणी पुढे केली आहे. मात्र गेल्या वर्षभरातील घटनाक्रम पाहता त्याची अंमलबजावणी होणे कठीण असून त्याचा मोठा फटका डेमोक्रॅट पक्षाला बसेल, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply