इस्रायल आणि सौदीचे नेते एकाचवेळी अमेरिकेत

वॉशिंग्टन – इराणचा अणुकार्यक्रम आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनापासून वाढत असलेला धोका इस्रायल आणि अरब देशांना जवळ आणत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. 2020 सालचा अब्राहम करार याच सहकार्याचा एक भाग ठरतो. येत्या काळात इस्रायल आणि सौदी अरेबियामध्येही सहकार्य प्रस्थापित होऊ शकते, असे दावे या देशांचे नेतेच करीत आहेत. इराणविरोधी आघाडीत हे दोन्ही देश एकत्र येतील, अशी शक्यता वर्तविली जाते. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि सौदी अरेबियाचे उपसंरक्षणमंत्री खालिद बिन सलमान यांची एकाचवेळी अमेरिकेतील उपस्थिती तसे संकेत देत आहेत.

इस्रायल आणि सौदीचे नेते एकाचवेळी अमेरिकेतअमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्ज यांनी बुधवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांची भेट घेतली. त्यानंतर गांत्झ यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन त्यांच्याशी चर्चा केली. बरोबर 24 तास आधी सौदी अरेबियाचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान हे देखील अमेरिकेमध्येच होते. प्रिन्स खालिद यांनी देखील सुलीवन आणि ऑस्टिन यांची भेट घेतली होती. इराणचा अणुकार्यक्रम आणि त्यापासून वाढलेला धोका, या एकाच मुद्द्यावर इस्रायल व सौदीच्या नेत्यांनी अमेरिकेशी चर्चा केली. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी ऑस्टिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत इराणच्या विरोधात प्लॅन बी हा वापरण्याचा प्रस्तावही ठेवला.

याशिवाय इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून आपल्या आणि आखाताच्या सुरक्षेसाठी निर्माण झालेल्या धोक्यावर इस्रायल व सौदीच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडली. गांत्झ आणि प्रिन्स खालिद एकाचवेळी अमेरिकेत असणे आणि दोघांकडूनही इराणच्या मुद्द्याप्रकरणी बायडेन प्रशासनावर दबाव टाकणं इस्रायली विश्लेषकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तर इस्रायल, सौदी आणि अमेरिका इराणविरोधात मोठी आघाडी उभारत असल्याचा दावा काही जण करीत आहेत. गेल्या 48 तासात वॉशिंग्टन आणि पेंटॅगॉनमध्ये घडलेल्या या भेटीगाठी इराणसाठी इशारा असल्याचे या इस्रायली विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, इराणविरोधात कठोर भूमिका टाळणाऱ्या बायडेन प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी इस्रायल व सौदी एकत्र येऊ शकतात, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. अमेरिकेच्या परवानगीशिवायही इराणवर हल्ला चढवू, असा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता. तर इराणसंलग्न हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळून बायडेन प्रशासनाने आपला विश्वासघात केल्याची टीका सौदीच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्य जाहीर मुलाखतीतून करीत आहेत. अशा परिस्थितीत इराणविरोध या एकाच मुद्द्यावर इस्रायल व सौदीच्या नेत्यांची अमेरिकेतील उपस्थिती लक्षवेधी ठरते.

leave a reply