लेबेनॉन सामाजिक विस्फोटापासून काही दिवस दूर – लेबेनॉनच्या काळजीवाहू पंतप्रधानांचा इशारा

बैरूत – ‘लेबेनॉन सामाजिक विस्फोटापासून अवघे काही दिवस दूर आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने लेबेनॉनला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. कारण या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असलेला लेबेनॉनमधील सामाजिक विस्फोटाचे परिणाम जगभरात उमटतील’, असा इशारा लेबेनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान हसन दियाब यांनी दिला. लेबेनीज पंतप्रधानांच्या या इशार्‍यावर वर्ल्ड बँकने चिंता व्यक्त केली. तर, इस्रायल व इस्रायलची जनता लेबेनॉनला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तयार असल्याचा प्रस्ताव इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. कतारने लेबेनीज जवानांना महिन्याभराचे राशन पुरविण्याची तयारी व्यक्त केली आहे.

लेबेनॉन भीषण अराजकतेच्या दिशेने पावले टाकत आहे. लेबेनॉनमधील 60 टक्क्याहून अधिक जनता दारिद्य्ररेषेखाली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लेबेनॉच्या चलनाचे मूल्य 91 टक्क्यांहून खाली घसरले आहे. लेबेनीज जनता त्रस्त बनली असून बाजारातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याचा दावा केला जातो. लेबेनॉनमध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोलपंपांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जागतिक बँकेने देखील, लेबेनॉन इतिहासातील सर्वात भीषण मंदीला सामोर जात असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली.

गेल्या दहा महिन्यांपासून लेबेनॉनचे काळजीवाहू सरकार चालविणारे पंतप्रधान हसन दियाब यांनी जगभरातील मित्रदेशांना मदतीचे आवाहन केले. आपला देश सामाजिक विस्फोटाचा उंबरठ्यावर उभा असल्याचा दावा पंतप्रधान दियाब यांनी केला. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरुन लेबेनीज जनतेला संबोधित करताना पंतप्रधान दियाब यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय तसेच शेजारी मित्रदेशांना मदतीचे आवाहन केले.

लेबेनॉनमध्ये अराजक माजले तर त्याचे परिणाम जागतिक समुदायालाही भोगावे लागतील, असा इशारा लेबेनॉनच्या पंतप्रधानांनी दिला. लेबेनॉनमधील या परिस्थितीला या देशाचे नेते जबाबदार असल्याची टीका युरोपिय महासंघाने गेल्या महिन्यात केली होती. गेल्या वर्षी 4 ऑगस्ट रोजी बैरूत बंदरात झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर तत्कालिन पंतप्रधान दियाब यांनी राजीनामा दिला होता. तत्यानंतर माजी पंतप्रधान साद हरिरी यांनाच लेबेनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले होते. पण इराणचे विरोधक असलेल्या हरिरी यांच्या निवडीला लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाहने कडाडून विरोध केला होता. तर हिजबुल्लाहच्या समर्थनावर राष्ट्राध्यक्ष झालेल्या मिशेल एऑन यांनीही हरिरी यांची निवड रोखून धरली.

त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून पंतप्रधान दियाब काळजीवाहू सरकार चालवित आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरातून लेबेनॉनला मिळणार्‍या मदतीवर होत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, इस्रायलने लेबेनॉनला मदत देण्याची घोषणा केली आहे.

इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी लेबेनॉनला याआधी केलेल्या सहाय्याची आठवण करून दिली. तसेच आत्ताही इस्रायल आपल्या शेजारी देशाच्या पाठिशी आहे आणि लेबेनॉनला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा तयार असल्याचे गांत्झ यांनी जाहीर केले. तर लेबेनॉनच्या दौर्‍यावर गेलेल्या कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या देशाच्या लष्करासाठी 70 टन राशन पुरविणार असल्याची घोषणा केली आहे.

leave a reply