‘ओपेक’मधील सौदी-युएई वादानंतर इंधनाचे दर भडकले

रियाध/दुबई – इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या बैठकीत सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) वाद विकोपाला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या वादामुळे ओपेक व ‘ओपेक प्लस’ सदस्य देशांमधील बैठक कोणत्याही ठोस कराराविना गुंडाळण्यात आली आहे. ओपेकमधील या वादाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर उमटले असून कच्च्या तेलाचे दर 75 डॉलर्स प्रति बॅरलवर गेले आहेत.

कोरोना साथीच्या कालावधीत इंधनाची मागणी घटल्याने ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ सदस्य देशांनी इंधनाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता इंधनाची मागणी पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने इंधन उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात ‘ओपेक’ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इंधन उत्पादन वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली. प्रतिदिन चार लाख बॅरल्स अशा वेगाने 58 लाख बॅरल्सपर्यंत उत्पादन वाढविण्याचा प्रस्ताव सौदीने मांडला.

मात्र सौदी अरेबियाने उत्पादनवाढीबाबत मांडलेल्या प्रस्तावाला ‘युएई’ने विरोध केला. उत्पादनात वाढ आवश्यक असली तरी आपल्याला कोटा वाढवून हवा असल्याची आग्रही भूमिका युएईने घेतली. मात्र युएईच्या मागणीला सौदी व इतर देशांनी नकार दिला. आतापर्यंत ओपेकच्या बैठकीमध्ये सौदी अरेबिया व युएईमध्ये अशारितीने मतभेद झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे यावेळच्या बैठकीत आखातातील दोन निकटतम मित्रदेशांमध्ये झालेला हा वाद अभूतपूर्व ठरतो.

कोरोनाची साथ सुरू असली तरी इंधनाची मागणी पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी इंधनाचे दरही गेल्या सहा महिन्यांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंधनाचे उत्पादन व निर्यात वाढवून अधिकाधिक लाभ मिळविण्याचे धोरण युएईकडून आखण्यात आले आहे. मात्र ओपेकने नकार दिल्यामुळे युएईच्या इराद्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी ओपेकने आतापर्यंत इंधनाच्या उत्पादनात घट करण्याबाबत करार केले असले तरी रशियासारख्या देशाने ते कधीच पाळलेले नाहीत, असा युएईचा दावा आहे.

या पार्श्‍वभूमीवर युएईने आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर सौदी अरेबियानेही ओपेक आपला प्रस्ताव बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ओपेकने घेतलेल्या बहुतांश निर्णयांमध्ये सौदी व युएईची एकजूट दिसून आली होती. मात्र यावेळी प्रथमच दोन देशांमधील मतभेद ऐरणीवर आले असून ही बाब ‘ओपेक’मधल्या फुटीचे संकेत ठरु शकतात, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. ओपेकने यापूर्वीही अंतर्गत संघर्ष अनुभवला असला तरी त्या सर्व प्रकरणांमध्ये सौदी व युएई एकत्र होते. ओपेक आतापर्यंत एकत्र राहिली, त्यामागे या सौदी व युएईची एकजूट हा महत्त्वाचा घटक ठरला होता. पण त्यांच्यातील विकोपाला गेलेला वाद ओपेकसाठी निर्णायक टप्पा ठरु शकतो, असे बोलले जात आहे.

दरम्यान, सौदी व युएईमधील वाद तडजोडीने मिटावा, यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त समोर येत आहे. ओपेकमधील वादाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही उमटले असून बुधवारी कच्च्या तेलाच्या दरांनी 75 डॉलर्स प्रति बॅरलवर उसळी घेतली. तेलाचे दर उसळत असतानाच सौदी अरेबियाने आशियाई बाजारपेठेसाठीचे दर ‘बेंचमार्क प्राईस’पेक्षा 2.70 डॉलर्सने वाढविल्याचेही उघड झाले आहे.

leave a reply