लेबेनॉन शक्तीशाली स्फोटाने हादरले १३५ ठार, पाच हजार जखमी

बैरुत – लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी झालेल्या शक्तीशाली स्फोटात १३५ जण ठार, तर किमान पाच हजार जण जखमी झाले. बैरुतच्या बंदरातील गोदामात साठवलेल्या अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाल्याची माहिती लेबेनीज सरकारने दिली. त्याचबरोबर बैरुतमध्ये पुढील दोन आठवड्यांसाठी इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे बैरुतमध्ये विषारी वायुचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवून अमेरिकेच्या दूतावासाने बैरुतमधील नागरिकांना घरातच राहण्याचे आणि शक्य असल्यास मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. हा स्फोट एखाद्या बॉम्ब हल्ल्यासारखा होता, अशी प्रतिक्रीया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

लेबेनॉन

बैरुतच्या बंदरातील गोदामात मंगळवारी सलग दोन स्फोट झाले. या स्फोटाची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता लेबेनॉनची वैद्यकीय तसेच स्थानिक यंत्रणा वर्तवित आहेत. बुधवार संध्याकाळपर्यंत १३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. किमान पाच हजार जण जखमी असून यातील ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा केला जातो. अजूनही बरेच जण इमारतींच्या ढिगार्‍याखाली दबले गेल्याची चिंता व्यक्त केली जाते. तर काही जण आपल्या कुटुंबियांचा शोध घेत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या स्फोटाने किमान तीन लाख जण बेघर झाले आहेत.

या स्फोटात बैरूतच्या बंदरात जमा असलेला धान्याचा साठाही नष्ट झाल्याची माहिती लेबेनीज सरकारने दिली. त्यामुळे साधारण महिनाभर पुरेल इतकाच धान्याचा साठा असल्याचा दावा लेबेनीज सरकार करीत आहे. याआधीच लेबेनॉनची अर्थव्यवस्था ‘हायपर-इन्फ्लेशन’चा सामना करीत आहे. या स्फोटाने लेबेनॉनचे ३.५ अब्ज डालर्सचे नुकसान झाल्याचा दावा केला जात असून या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

सदर बंदरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांचे (युनिफील) जहाजाचे या स्फोटात नुकसान झाले असून काही जवानही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या स्फोटात घटनास्थळाजवळ असलेल्या तीन रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर रुग्णांची तसेच या स्फोटातील जखमींची व्यवस्था करण्यात अडचणी येत असल्याची माहिती येथील ‘ऑर्डर ऑफ नर्सेस’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्ना डौमित यांनी स्पष्ट केले.

बैरुतच्या बंदरात झालेल्या या स्फोटासाठी सर्वात आधी इस्रायलकडे संशयाने पाहिले जात होते. हिजबुल्लाहबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्कराने बैरुतवर हल्ला चढविल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर माजी पंतप्रधान रफीक हरीरि यांच्या हत्येचा निकाल येत्या शुक्रवारी असल्यामुळे या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी हिजबुल्लाहने हा स्फोट घडविल्याचेही बोलले जात होते. पण इस्रायली लष्कर आणि हिजबुल्लाहने या घटनेशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले.

लेबेनॉन

मात्र गोदामातील २७५० टन अमोनियम नायट्रेटच्या असुरक्षित साठ्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती पंतप्रधान हसन दियाब यांनी दिली. शेती तसेच स्फोटकांसाठी वापरल्या जाणार्‍या या रसायनाचा इतक्या प्रचंड प्रमाणात साठा केल्याचे उघड झाल्यानंतर लेबेनीज सरकारने पाच दिवसात या स्फोटासाठी जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पुढील काही दिवसांसाठी लेबेनीज लष्कराने बैरुतची सुरक्षा हातात घ्यावी, अशी सूचना केली आहे.

लेबेनॉन

या स्फोटामुळे बैरुतमध्ये ३.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या स्फोटाचे हादरे १८० मैल अंतरावर असलेल्या सायप्रस या युरोपिय देशापर्यंत जाणवल्याचा दावा केला जातो. स्फोटामुळे बंदरभागात काही सेकंदासाठी मशरुमप्रमाणे धुराचे ढग जमा झाले होते. दुसर्‍या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यासारखा प्रसंग निर्माण झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रीया दिली असून हा स्फोट एखाद्या बॉम्ब हल्ल्यासारखा होता, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या घटनेवर आत्ताच काही बोलणे योग्य ठरणार नसल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. या स्फोटानंतर जगभरातील प्रमुख देशांनी लेबेनॉनमध्ये सहाय्य पाठविण्याची घोषणा केली आहे. ब्रिटन, जर्मनी, मलेशिया, तुर्की तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील आपल्या शेजारी देशाच्या मदतीसाठी पथक रवाना करण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर इस्रायलने जखमींवर इस्रायली रुग्णालयात उपचार देण्याची तयारी वर्तविली आहे.

leave a reply