पाकिस्तानचा नवा नकाशा म्हणजे राजकीय मूर्खपणा असल्याचा भारताचा टोला

नवी दिल्ली – ‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रसिद्ध केलेला तथाकथित नवा राजकीय नकाशा म्हणजे निव्वळ राजकीय मूर्खपणा आहे. त्याला कोणत्याही प्रकारची आंतरराष्ट्रीय मान्यता अथवा कायदेशीर आधार नाही. उलट त्यातून पाकिस्तान प्रादेशिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवण्याच्या कल्पनेने कसा पछाडला आहे आणि त्यासाठी दहशतवादासह कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे हेच दिसून येते’, असा सणसणीत टोला भारताने लगावला आहे. मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका पत्रकार परिषदेत भारताच्या जम्मू-काश्मीर, लडाख, जुनागड व सर क्रीक या भागांचा समावेश असलेला पाकिस्तानचा नवा ‘पॉलिटिकल मॅप’ प्रसिद्ध केला. त्यावर भारताने आपले खरमरीत प्रतिक्रिया नोंदविली आहे.

नकाशा

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखण्यात येणारे ‘गिलगीट-बाल्टिस्तान’ भारताचाच भाग असल्याचेही जाहीर केले होते. भारताच्या या निर्णयावर आगपाखड करून त्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाठिंबा मिळवण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. या प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तानमध्येही खिल्ली उडविण्यात आली होती. भारताच्या निर्णयावर टीका करण्याऐवजी इम्रान खान यांनी पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत असा उपरोधिक सल्ला देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, भारतीय भूभागाचा समावेश असलेला नवा नकाशा प्रसिद्ध करून आपण भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचा देखावा इम्रान खान यांनी उभा केल्याचे दिसत आहे.

इम्रान खान यांच्या या निर्णयामागे चीनची फूस असल्याचे मानले जाते. गलवान व्हॅली संघर्षात भारताने दिलेल्या जबरदस्त दणक्यामुळे चीन चांगलाच हादरला आहे. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला मिळालेल्या समर्थनाने चीनचे या क्षेत्रातील इरादे धुळीस मिळाले आहेत. सध्याची भूराजकीय समीकरणेही चीनच्या विरोधात गेली असून दक्षिण आशियात भारताच्या शेजारी राष्ट्रांना भडकावून नवी आघाडी उघडण्याचा चीनचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान व नेपाळसह अफगाणिस्तानबरोबर एक बैठकही घेतली होती. नेपाळ व अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आदर्श घ्यावा आणि चीनसोबत सहकार्य दृढ करावे, असा सल्ला चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी या राष्ट्रांना दिला होता.

पाकिस्तान व नेपाळच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न चीनने यापूर्वीच सुरू केले आहेत. त्यासाठी या देशांकडून भारताविरोधात चिनी डावपेच वापरले जात आहेत. आपल्या सीमेला लागून असलेल्या शेजारी देशांच्या भागांवर हक्क सांगायचा, त्याचे नकाशे प्रसिद्ध करायचे व घुसखोरी करून तो भाग गिळंकृत करायचा, हा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विस्तारवादी धोरणाचा भाग मानला जातो. पाकिस्तान व नेपाळने गेल्या काही दिवसात घेतलेले भारतविरोधी निर्णय याच धोरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न दिसतो. काही दिवसांपूर्वी नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा व लिपुलेखसह ३९५ चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखविला होता. त्यानंतर उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील सीमेलगतच्या भागांवर दावा ठोकून नेपाळने आणखी एक वाद उकरून काढला होता.

leave a reply