लेबेनॉनच्या पंतप्रधान नियुक्त हरिरी यांचा राजीनामा

- लेबेनॉनमधील राजकीय संकट तीव्र झाले

हरिरीबैरूत – ‘राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांच्या मागण्या मान्य करण्यासारख्या नाहीत. यापुढे ईश्‍वरच या देशाचे रक्षण करो’, असे सांगून लेबेनॉनचे पंतप्रधान नियुक्त साद हरिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हरिरी यांच्या या राजीनाम्यानंतर राजधानी बैरूतमध्ये हिंसक निदर्शने आणि जाळपोळ सुरू झाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत लेबेनीज पौंडचे मूल्य विक्रमी स्तरावर घसरले आहे. दरम्यान, लेबेनॉन सामाजिक विस्फोटापासून काही दिवस दूर असल्याचा इशारा या देशाचे काळजीवाहू पंतप्रधान हसन दियाब यांनी नुकताच दिला होता.

गेल्या वर्षी बैरूत बंदरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात सुमारे 200 जणांचा बळी गेला होता. या घटनेनंतर लेबेनॉनमधील सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे आधीच संकटात सापडलेली लेबेनॉनची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडली होती. चलनवाढ शिगेला पोहोचल्यामुळे लेबेनॉनमधील जनतेला अन्नधान्याची खरेदी करणे अवघड होऊ लागले होते. इंधन, वीज आणि औषधांचा पुरवठा तोकडा पडत होता.

देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल, तर लवकरात लवकर लेबेनॉनमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची आवश्यकता असल्याची जाणीव जागतिक बँकेने करून दिली होती. त्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लेबेनॉनच्या संसदेने साद हरिरी यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली होती. हरिरी यांनी देखील टेक्नोक्रॅट्स अर्थात कौशल्यसंपन्न नेत्यांची निवड करून सदर मंत्रीमंडळाची यादी राष्ट्राध्यक्ष एऑन यांच्याकडे दिली होती.

गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत, इराणसमर्थक हिजबुल्लाहशी संलग्न असलेल्या राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी हरिरी सरकारमधील मंत्रीमंडळाची ही यादी धुडकावली. तसेच नव्या सरकार स्थापनेसाठी लवकरच तारीख घोषित करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी स्पष्ट केले. पण मंत्रीमंडळावर स्वत:चे नियंत्रण रहावे म्हणून राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी सुचविलेले बदल देशाच्या हिताचे नव्हते, असा आरोप हरिरी यांनी केला.

हरिरीहरिरी यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर लेबेनॉनच्या प्रमुख शहरांमध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली. राजधानी बैरूतमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केल्याच्या व रस्ते रोखल्याच्या बातम्या आहेत. काही ठिकाणी निदर्शकांनी लेबेनीज जवानांवर दगडफेक केल्याचा दावा केला जातो. यात एक जवान जखमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत लेबेनीज पौंड 21 हजारपर्यंत घसरले.

लेबेनॉनमधील या राजकीय अस्थैर्यावर आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लेबेनॉनच्या नेत्यांना त्यांनीच निर्माण केलेल्या या संकटावर तोडगा मिळत नसल्याची टीका फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन येस ले-द्रियान यांनी केली. सरकार स्थापन करण्यात आलेले अपयश हे लेबेनॉनसाठी मोठे संकट ठरेल, असा इशारा फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. लेबेनीज नेत्यांनी त्यांचे मतभेद बाजूला ठेवून लवकर सरकार स्थापन करावे, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केले. तर या निर्णयाचे लेबेनॉनला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चिंता अरब लीगने व्यक्त केली. तर लेबेनॉनमधील या अस्थैर्याचा परिणाम सीमेवरील सुरक्षेवर होऊ शकतो, असे सांगून इस्रायलने आपल्या लष्कराला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, लेबेनॉनमध्ये लवकरात लवकर सरकार स्थापन झाले नाही तर या देशावर निर्बंध टाकण्याचा इशारा युरोपिय महासंघाने याआधीच दिला होता. तर सरकार स्थापन करण्यात अपयश मिळाल्यामुळे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था लेबेनॉनकडे पाठ फिरवू शकतात, असा दावा केला जातो.

leave a reply