जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानात ‘लिथिअम’चा प्रचंड साठा सापडला

- देशाची ८० टक्के मागणी पूर्ण करण्याची क्षमता

नवी दिल्ली – ‘व्हाईट गोल्ड’ किंवा भविष्यातील इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लिथिअम’ खनिजाचे साठे राजस्थानात सापडले आहेत. राजस्थान सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘जिओग्राफीकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (जीएसआय) हवाल्याने समोर येत असलेल्या अहवालानुसार हा साठा जम्मू-काश्मीरमध्ये आढळलेल्या ‘लिथिअम’च्या साठ्यांपेक्षा मोठा असून देशाच्या एकूण आवश्यकतेपैकी ८० टक्के मागणी पूर्ण करण्याची क्षमता या साठ्यांमध्ये आहे, असे दावे समोर येत आहे. सध्या भारत हा लिथिअमसाठी चीन, ऑस्ट्रोलिया आणि दक्षिण अमेरिकी देशांवर अवलंबून आहे. पुढील काळात भारताची आयात ‘लिथिअम’ निर्भरता संपेल. उलट भारत या लिथिअमचा मोठा पुरवठादार देश म्हणून जागतिक पटलावर उदयाला येऊ शकेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये लिथिअमचा प्रचंड साठा सापडल्याचे हे वृत्त देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते.

जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानात ‘लिथिअम’चा प्रचंड साठा सापडला - देशाची ८० टक्के मागणी पूर्ण करण्याची क्षमताफेंब्रुवारी महिन्यात ‘जीएसआय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जम्मू-काश्मीरच्या रिआसी जिल्ह्यात लिथिअमचे साठे सापडल्याचे घोषित करण्यात आले होते. येथे एकूण ५९ लाख टनाचे लिथिअम सापडले आहे आणि याचे मूल्य आताच्या दरानुसार सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्स इतके असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या ‘लिथिअम’साठ्यांनी देशाचे भविष्य व इंधन सुरक्षा सुनिश्चित केल्याचे दावे करण्यात आले होते. तसेच या साठ्यांमुळे भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणारा जगातील अग्रणी देश बनेल, असेही म्हटले जात आहे.

जम्मू-काश्मीरध्ये इतका प्रचंड लिथिअम साठा सापडला असताना देशात आणखी एका राज्यात लिथिअम साठ्यांचा शोध लागला आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात देगाना महापालिका क्षेत्रात हे लिथिअम साठे आढळले आहेत. या साठ्यांचे निश्तिच प्रमाण किती आहे, हे जाहीर झालेले नाही. तसेच अधिकृत पातळीवर राजस्थान सरकार आणि जीएसआयकडूनही याची माहिती घोषित करण्यात आलेली नाही. मात्र राजस्थान सरकार आणि जीएसआयच्याच हवाल्याने येथे जम्मू-काश्मीरपेक्षाही प्रचंड साठा सापडल्याचे दावे वृत्त अहवालांमधून करण्यात आले आहेत. देशातील एकूण लिथिअमची ८० टक्के मागणी पूर्ण करण्याची क्षमता या साठ्यांमध्ये आहे. इतके हे साठे प्रचंड आहेत, असा दावा केला जात आहे.

लिथिअम हा मऊ धातू असून त्याच्यामुळे केमिकल एनर्जीचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. मोबाईल फोनमधील बॅटरींमध्ये लिथिअम वापरले जाते. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागणाऱ्या बॅटरीही लिथिअमपासून बनविल्या जातात व याच पुनर्वापर होऊ शकतो. भविष्यात पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहने घेणार आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे देशाची लिथिअमची मागणीही वाढत आहे. मात्र भारताला आपली मागणी पूर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलप्रमाणेच आतापर्यंत इतर देशांवर अवलंबून रहावे लागत होते. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, चिली, बोलिव्हिया, अर्जेंटिनासारख्या देशात लिथिअमचे मोठे साठे आहेत. भारताला या देशांकडून लिथिअयम आयात करावे लागते. जगातील ४७ टक्के लिथिअम उत्पादन एकट्या ऑस्ट्रेलियात होते. त्यानंतर ३० टक्के चिली, १५ टक्के चीनमध्ये होते. तसेच जगातील ५८ टक्के लिथिअमवर प्रक्रिया ही चीनमध्ये केली जाते. तर २९ टक्के चिलीमध्ये आणि १० टक्के अर्जेंटिनामध्ये होते.

भारतात जम्मू-काश्मीरपाठोपाठ राजस्थानात सापडलेल्या लिथिअमसाठ्यांमुळे नजीकच्या काळात भारताचा समावेशही जगातील लिथिअम पुरवठादार देशांमध्ये होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दोन वर्षांपूर्वी कर्नाटकात देशातील लिथिअमचा पहिला साठा सापडला होता. हा साठा अवघा १६०० टनाचा होता. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथिअम साठ्यामुळे भारत सर्वाधिक लिथिअमसाठा असलेल्या देशांमध्ये जगात पाचव्या स्थानावर आला होता. राजस्थानातील लिथिअम साठ्यांमुळे भारताच्या या क्रमवारीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील या लिथिअम साठ्यांच्या उत्खननासाठी सध्या प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जमिनीचे सर्वेक्षण पार पडले असून येथील प्रकल्पग्रस्तांची यादीही तयार करण्यात आली आहे. तसेच या क्षेत्राच्या आजूबाजूच्या भागातही आता सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील या लिथिअम खाणींचा लिलाव डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असे नुकतेच केंद्रीय खाण सचिव विवेक भारद्वाज यांनी म्हटले होते.

leave a reply