सौदी-इराणमधील सहकार्य इस्रायलसाठी घातक ठरेल

- ब्रिटिश वर्तमानपत्राचा इशारा

लंडन – सौदी अरेबिया आणि इराणमध्ये प्रस्थापित झालेले सहकार्य आखातातील वाद मिटवून नव्या सहकार्याला दिशा देणारे ठरेल. यामुळे सिरियाचा अरब लीगमधील समावेश होईल. तसेच येमेन, लेबेनॉनबरोबरचे अरब देशांबरोबरील संबंध सुधारतील. याआधीच सौदी-इराणमधील सहकार्यामुळे अमेरिकेचा आखातातील प्रभाव कमी होऊन इथे चीनला मोठा वाव मिळालेला आहे. मात्र येत्या काळात आखातातील हे बदल इस्रायलसाठी घातक ठरतील, असा इशारा ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने दिला.

सौदी-इराणमधील सहकार्य इस्रायलसाठी घातक ठरेल - ब्रिटिश वर्तमानपत्राचा इशारामहिन्याभरापूर्वी चीनच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया आणि इराणमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले. गेल्या आठवड्यात इराणने सौदीतील आपले दूतावास सुरू करून राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. तर सौदीने देखील सुदानच्या संघर्षात अडकलेल्या ६० इराणी नागरिकांची सुटका केली. येत्या काळात सौदी व इराणमधील सहकार्य अधिक वाढेल, असे संकेत देणाऱ्या बातम्या येत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी लवकरच सौदीचा दौरा करुन राजे सलमान व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊ शकतात. तर दोन्ही देशांदरम्यान लवकरच प्रवासी विमान वाहतूक देखील सुरू होईल. तसेच सौदीची बाजारपेठ इराणच्या पोलादासाठी मोकळी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. इतरही आघाड्यांवर दोन्ही देशांमध्ये लवकरच सहकार्य प्रस्थापित होईल, असा दावा केला जातो.

ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वर्तमानपत्राने अरब विश्लेषकाच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या बातमीत सौदी-इराण सहकार्य इतर अरब देशांसाठी सहाय्यक ठरेल, असे म्हटले आहे. ४० वर्षात पहिल्यांदाच सौदी व इराण वैमनस्य बाजूला ठेवून एकत्र आल्यामुळे अरब-आखातातील दोन गट देखील एकत्र येतील, असे या अरब विश्लेषकाने म्हटले आहे. सिरियातील अस्साद राजवटीला सौदी व अरब लीगच्या इतर देशांकडून मान्यता मिळू शकते. त्याचबरोबर येमेनमधील हौथी बंडखोर आणि लेबेनॉनमधील हिजबुल्लाहबरोबरील अरब देशांचे संबंध देखील सुधारू शकतात, असा दावा या विश्लेषकाने केला. सौदी-इराणमधील सहकार्य इस्रायलसाठी घातक ठरेल - ब्रिटिश वर्तमानपत्राचा इशारातसेच या सहकार्यामुळे इराणची आर्थिक कोंडी संपुष्टात आली आहे. तर चीनला सौदीची बाजारपेठ खुली झाल्याचे या विश्लेषकाचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडी अमेरिकेचा आखातातील प्रभाव संपुष्टात आणण्यासाठी आणि चीनला आखातात पाय रोवण्यासाठी सहाय्यक ठरत असल्याचे याकडे विश्लेषकाने लक्ष वेधले. यामुळे इस्रायलने अरब देशांबरोबर केलेला अब्राहम करार देखील धोक्यात येऊ शकतो, असा इशारा या विश्लेषकाने दिला. तर चीनच्या मध्यस्थी नंतरही इराण व सौदीमधील सहकार्य संथगतीने पुढे जाईल, असा दावा युरेशिया ग्रूप या अभ्यासगटाचे प्रमुख अयहम कामेल यांनी केला.

दरम्यान, ब्रिटनमधील दुसऱ्या एका अभ्यासगटाने सौदी-इराण सहकार्य येत्या काळात कोलमडेल, असा दावा केला आहे. लंडनस्थित ‘युरोपियन काऊन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या अभ्यासगटाचे विश्लेषक सिंझीया बियांको यांनी सौदी-इराण सहकार्याबाबत अवाजवी अपेक्षा ठेवता येणार नाही, असे बजावले आहे. सौदी-इराणमधील सहकार्य प्रस्थापित करण्याबाबतचा करार लवकरच निकालात निघू शकतो, असे बियांको यांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेतील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यावर किंवा इस्रायलने इराणमध्ये हल्ला चढविल्यावर सौदी-इराण सहकार्याला फारसे महत्त्व उरणार नाही, असे या अभ्यासगटाने म्हटले आहे.

हिंदी English

 

leave a reply