ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रुस यांची निवड

Liz Trussलंडन – ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्रीपदावर असलेल्या लिझ ट्रुस यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षात झालेल्या निवडणुकीत ट्रुस यांनी आपले प्रतिस्पर्धी रिषी सुनाक यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थक आणि कट्टर रशिया व चीनविरोधी अशी प्रतिमा असलेल्या ट्रुस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरतील. त्यांच्यापूर्वी मार्गारेट थॅचर व थेरेसा मे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती.

Boris Johnsonकोरोना साथीच्या काळातील काही प्रकरणे, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित समारंभ व अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त नियुक्त्या या कारणांमुळे बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. त्यानंतर सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षाने नेतेपदासाठी जाहीर केलेल्या निवडणुकीत लिझ ट्रुस व रिषी सुनाक यांनी अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळविले होते. अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतदानात लिझ ट्रुस यांनी ८१,३२६ तर रिषी सुनाक यांना ६०,३९९ मते मिळाली.

ट्रुस यांनी करकपात व सरकारचा आकार कमी ठेवण्याबाबत घेतलेली भूमिका तसेच ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी मांडलेली महत्त्वाकांक्षी योजना यामुळे त्या बहुमत मिळविण्यात यशस्वी ठरल्या, असे सांगण्यात येते. माजी पंतप्रधान जॉन्सन यांना अखेरपर्यंत दिलेले समर्थन ही बाबही सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी उचलून धरल्याचे सांगण्यात येते. ट्रुस यांना एकूण मतदानातील ५७ टक्के मते मिळाली आहेत, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. पंतप्रधान म्हणून निवडीची घोषणा झाल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रुस यांनी प्रतिस्पर्धी सुनाक यांचे अभिनंदन करतानाच एक कुटुंब म्हणून पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी प्रयत्न करु, अशी ठाम ग्वाही दिली.

New-P-Mऑक्सफर्डमधील जन्म व ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या ४७ वर्षीय लिझ ट्रुस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ‘लिबरल डेमोक्रॅट’ पक्षातून केली होती. कालांतराने ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षात दाखल झालेल्या ट्रुस यांनी सुरुवातीच्या काळात ‘ब्रेक्झिट’लाही विरोध केला होता. मात्र नंतर ट्रुस यांनी ब्रेक्झिटचे कट्टर समर्थन करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला होता. पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी लिझ ट्रुस यांनी शिक्षण, पर्यावरण, न्याय, व्यापार व परराष्ट्र या विभागांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

कट्टर रशिया व चीनविरोधी अशी प्रतिमा असलेल्या ट्रुस यांनी रशिया-युक्रेन युद्धापूर्वी युक्रेनला भेट देऊन रशियावर घणाघाती टीकास्त्र सोडले होते. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबर झालेली शाब्दिक चकमकही माध्यमांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती. ब्रिटनमधील नागरिकांना युक्रेनमधील युद्धात सहभागी होण्यासाठी त्यांनी दिलेला पाठिंबा वादग्रस्त ठरला होता. चीनची ब्रिटनमधील संवेदनशील क्षेत्रात असलेली गुंतवणूक तसेच हाँगकाँग व तैवानबाबतची भूमिका या मुद्यांवरही ट्रुस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने विविध देशांबरोबर केलेल्या व्यापारी करारांमध्ये ट्रुस यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रुस यांच्यासमोर ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’, निर्वासितांची घुसखोरी, युक्रेनमधील युद्ध व ब्रेक्झिटची पुढील अंमलबजावणी ही प्रमुख आव्हाने असतील, असा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply