कॅनडातील हत्याकांडात १० जणांचा बळी

- दोन संशयित हल्लेखोर फरार

canada_suspectsओटावा – रविवारी कॅनडाच्या सास्काशेवन प्रांतात दोन संशयितांनी केलेल्या चाकूहल्ल्यात १० जणांचा बळी गेला. कॅनडात ‘इंडिजिनिअस कम्युनिटी’ अर्थात मूळनिवासींचे क्षेत्र म्हणून ओळखण्यात येणारा भागात ही घटना घडली. अशा प्रकारे ‘मास किलिंग’च्या घटना कॅनडात दुर्मिळ असल्याने रविवारच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रूड्यू यांनी सदर घटना भयावह व वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया दिली.

स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास कॅनडातील ‘जेम्स स्मिथ क्री फर्स्ट नेशन’ भागातील पोलीसांना चाकूहल्ल्याची घटना घडल्याची पहिली माहिती मिळाली. त्यानंतर पुढील अर्ध्या तासात एकापाठोपाठ एक चाकूहल्ले झाल्याचे समोर आले. वेल्डन गावासह १३ वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ले झाले आहेत. सव्वासातच्या सुमारास स्थानिक पोलीस यंत्रणांनी अलर्ट जारीकेला.

canada_attacksपोलीस पथके घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवळपास २५ जणांना चाकूने भोसकल्याचे उघड झाले. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी आहेत. चाकूहल्ला करणारे दोन संशयित हल्लेखोर असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे डॅमिअन सँडरसन व माईल्स सँडरसन अशी आहेत. पोलीसांनी दोन्ही संशयितांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. दुपारी १२च्या सुमारास सास्काशेवन प्रांताची राजधानी असणाऱ्या रेजिना शहरात संशयित हल्लेखोरांना पाहिल्याची माहिती देण्यात आली.

मात्र या घटनेला २४ तास उलटल्यानंतरही हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही. सास्काशेवन प्रांतासह अल्बर्ट व मनिटोबा या तिन्ही प्रांतांमध्ये व्यापक शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रूड्यू यांनी देशातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनोळखी व्यक्तींना आश्रय देऊ नये, असे बजावले आहे. त्याचवेळी ‘इंडिजिनिअस कम्युनिटी’ला सर्वप्रकारे सहाय्य पुरविण्यास सरकार सज्ज असल्याचेही सांगितले.

गेल्या वर्षभरात कॅनडाच्या विविध प्रांतांमध्ये ‘इंडिजिनिअस कम्युनिटी’मधील शाळकरी मुलांची सामूहिक थडगी सापडण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. या घटनांनी संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. कॅनडा सरकारला याप्रकरणी ‘इंडिजिनिअस कम्युनिटी’ची जाहीर माफी मागणे भाग पडले होते. या पार्श्वभूमीवर हत्याकांडाची घटना समोर आल्याने ट्यू्रड्यू सरकारला नवा धक्का बसला आहे.

leave a reply