वस्त्रमंत्रालयाकडून ‘लोकल फॉर दिवाली’ मोहीम

नवी दिल्ली – केंद्रीय वस्त्रमंत्रालयाने ‘#लोकल फॉर दिवाली’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत वस्त्रमंत्रालयाने जनतेला या दिवाळीत भारतीय हस्तकलेची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ला प्राधान्य देण्याचा संदेश दिला होता.

'लोकल फॉर दिवाली'

वस्त्रमंत्रालयाने ‘#लोकल फॉर दिवाली’ या मोहिमेअंतर्गत घरात लागणाऱ्या बेडशिटस् ते पडद्यापर्यंत सर्व स्थानिक बाजारातूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मातीच्या पणत्यांपासून हस्तकलेची इतर उत्पादनेही स्थानिक बाजारातूनच खरेदी करा, असेही वस्त्रमंत्रालयाने म्हटले आहे. स्थानिक कारागीर, कलाकार आणि व्यावसायिकांकडूनच वस्तू खरेदी करुन इतरांनाही तसे करण्यासाठी प्रोत्साहन द्या. वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर ‘#लोकल फॉर दिवाली’ या हँशटँग अंतर्गत शेअर करा, असे आवाहन वस्त्रमंत्रालयाने केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या दिवाळीत ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा दिल्यानंतर वस्त्रमंत्रालयाने ही मोहीम सुरु केली. देशात मोठ्या प्रमाणावर हस्तकला उद्योग आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश आहे. २०१९ साली भारताने १२८ अब्ज रुपये इतकी हस्तकलेची उत्पादने निर्यात केली. पण जागतिक हस्तकलेच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा अवघा दोन टक्के आहे. तर चीनचा १७ टक्के आहे. या बाजारपेठेत भारताच्या हिस्सा वाढविण्यासाठी भारतीय हस्तकला उत्पादनांचा प्रसार होणे गरजेचे आहे. यासाठी ही मोहीम सुरु केली आहे.

दरम्यान, भारतीय बाजारपेठांमध्ये चीनी उत्पादने मोठ्या प्रमाणावर होती. पण गलवान व्हॅलीत भारताचे २० जवान शहीद झाल्यावर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम सुरु झाली. या पार्श्वभूमीवरच ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा भारतीयांनी मनावर घेतल्याचे पहायला मिळत आहे. तसेच बहुतांश व्यापांऱ्यानी यावर्षी चिनी उत्पादनांना स्थान न देता स्थानिक उत्पादनेच विक्रीसाठी ठेवली आहेत.

leave a reply