‘लॉकडाऊन’चे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील

- ‘फिक्की’चा दावा

अर्थव्यवस्थेवरनवी दिल्ली – महाराष्ट्रात कडक ‘लॉकडाऊन’ लागला तर कोरोनाचे संक्रमण कमी करण्यात मदत मिळेल, मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम होतील, असा इशारा देेशातील उद्योजकांची संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री’ने (फिक्की) दिला आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण ‘लॉकडाऊन’ न लावता ‘लॉकडाऊन’ सदृष्य निर्बंध राज्यात लावले आहेत. संघटनेच्या सदस्यांना वाटणार्‍या चिंता राज्य सरकारकडे मांडल्याचे ‘फिक्की’चे महाराष्ट्रातील अध्यक्षा सुलाजा फिरोदिया मोटवानी यांनी स्पष्ट केले.

बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात १५ दिवसांच्या संचारबंदीला सुरूवात झाली. कडक ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला नसला, तरी अशत: ‘लॉकडाऊन’चे स्वरुप या निर्बंधांना आहे. महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’ लावण्यात येऊ नये यासाठी व्यापारी आणि अद्योजकांकडून सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटना सरकारशी चर्चाही करीत आहेत.

‘फिक्की’नेही आपली राज्य सरकारबरोबर चर्चा झाली असून संघटनेच्या संदस्यांकडून आलेल्या सूचना, त्यांना वाटणार्‍या चिंता याची माहिती राज्य सरकारला देण्यात आल्याचे मोटवानी म्हणाल्या. मागणी आणि पुरवठ्याबाबत कितीतरी चिंता आहेत. कित्येक कंपन्यांचे उत्पादन कारखाने महाराष्ट्रात आहेत. येथून ही उत्पादने देशभरात पोहाचतात, विकली जातात. त्यामुळे यामध्ये अडथळे आले किंवा ही साखळी विस्कळीत झाली तर त्याचा नकारात्मक परिणाम ग्राहकांवर होईल, असे सुलजा मोटवानी यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील हे निर्बंध ३० एप्रिलच्या पुढे वाढणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

१५ दिवसांच्या संचारबंदीच्या कालावधीत कमीत कमी आर्थिक परिणाम व्हावा यासाठी फिक्की राज्य सरकारबरोबर मिळून काम करीत आहे, असेही मोटवानी यांनी सांगितले. तसेच त्यांनी सर्व राज्य सरकारांना आग्रह करताना निर्बंधांच्या काळात उद्योगांना मदत करावी. विशेषत: अनौपचारीक क्षेत्रावर या निर्बंधांचा खूप परिणाम होणार असून राज्य सरकारांनी त्यांची दखल घ्यावी, असे आवाहन मोटवानी यांनी केले.

याआधी ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ने (सीआयआय) या उद्योगांच्या संघटनेनेही ‘लॉकडाऊन’ लावू नका, असे आवाहन केले होते. तसेच निर्बंधांच्या काळात उद्योग कोणताही अडथळा न येता चालू राहिले पाहिजेत, असा असे म्हटले होते.

देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्याचा सरकारचा विचार नाही – केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली – देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्याचा कोणताही विचार नाही. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते, तसे आता करण्यात येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी वर्ल्ड बँकेच्या प्रमुखांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली व कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असला तरी संपूर्ण ‘लॉकडाऊन’ करून अर्थव्यवस्था ठप्प करण्याचा कोणताही विचार नाही, असे यावेळी सीतारामन म्हणाल्या. मात्र स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी पावले उचलली जातील, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. भारताच्या विकासाला गती देण्यासाठी वर्ल्ड बँंकेने दिलेल्या कर्जसहाय्याचे सीतारामन यांनी स्वागत केले आहे.

 

leave a reply