देशाकडील परकीय गंगाजळी ५०० अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली/मुंबई – देशाकडील परकीय गंगाजळी वाढून ५०० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे सर्वाधिक परकीय गंगाजळी असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अर्थतज्ज्ञ वाढलेल्या या परकीय गंगाजळीकडे अर्थव्यवस्थेसाठी उत्तम संकेत म्हणून पाहत आहेत. मार्च महिन्यापासून देशाकडील परकीय गंगाजळीत तब्बल २४ अब्ज डॉलर्सहून अधिकने वाढली असून भारतीय रुपया यामुळे मजबूत होईल व त्याचे अवमूल्यन थांबेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच अनेक तज्ज्ञ भारताकडील परकीय गंगाजळी अर्धा ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाणे हा ऐतिहासिक क्षण म्हणून पाहत आहेत.

RBI५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय गंगाजळी वाढून ५०१.७० अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केले आहे. एका आठवड्यात परकीय गंगाजळीत ८.२२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. याआधीच्या आठवड्यात २९ मे रोजी पर्यंत देशाकडील परकीय गंगाजळी ३.४४ अब्ज डॉलर्सने वाढली होती आणि ती ४९३.४८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.

‘आरबीआय’ने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशाच्या परकीय गंगाजळीतील सर्वात मोठा भाग असलेल्या ‘फॉरेन करन्सी एसेट’मध्ये (एफसीए) आठवडाभरात ८.४२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मात्र देशाकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३२.९ कोटी डॉलर्सने घटून ३२.३५२ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे.

३० वर्षांपूर्वी १९९० च्या दशकात देशाकडील परकीय गंगाजळी जवळ जवळ शून्यावर पोहोचली होती आणि भारताला आपले अर्थव्यवहार चालू ठेवण्यासाठी देशाकडील सोन्याचा साठा ब्रिटनकडे गहाण ठेवावा लागला होता. मार्च १९९१ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे केवळ ५.८ अब्ज डॉलर्स इतकीच परकीय गंगाजळी शिल्लक होती. मात्र आता भारत सर्वाधिक परकीय गंगाजळी असलेल्या देशात पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडील (आयएमएफ) माहितीनुसार चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतर भारताकडे सर्वाधिक परकीय गंगाजळी आहे. तैवान आणि सौदी या देशांना भारताने याबाबतीत मागे टाकले आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे इंधनाची मागणी कमी झाल्याने सौदी आणि इतर आखाती देशांच्या परकीय गंगाजळीत मोठी घट झाली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी हालचाली थांबल्या होत्या. त्यामुळे इतर देशातून आयातही घटली. त्याचवेळी येणारी गुंतवणूक वाढली आहे, हे देशाकडील परकीय गंगाजळी वाढण्यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात दोन अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली, याकडे अर्थतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

leave a reply