इराणकडून दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्राची चाचणी

इराणकडून इस्रायलसह अमेरिका व युरोपिय देशांना धमकी

iran missileतेहरान – ‘२००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची इराणने चाचणी केली. यामुळे भूमध्य समुद्रातून गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका इराणच्या या क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रापासून सुरक्षित राहू शकणार नाहीत,’ असा इशारा रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आमच्या निशाण्यावर असून लवकरच त्यांचा काटा काढण्यात येईल, अशी धमकी इराणच्या या अधिकाऱ्याने दिली.

दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समधील एरोस्पेस कमांडचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल आमीर-अली हाजिझादेह यांचा व्हिडिओ सरकारी वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये ब्रिगेडिअर जनरल हाजिझादेह ‘पावेह’ नावाच्या क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्राजवळ उभे असल्याचे दाखविण्यात आले. पुढे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. यानंतर हाजिझादेह यांनी या क्षेपणास्त्राची माहिती तसेच पाश्चिमात्य देशांना दिलेला इशारा इराणी वृत्तवाहिनीने प्रसारीत केला.

iran soleimani trump२००० किलोमीटर अंतरावरुन प्रवास करणाऱ्या अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्याची क्षमता इराणने प्राप्त केल्याची घोषणा ब्रिगेडिअर जनरल हाजिझादेह यांनी केली. ‘युरोपिय देशांबद्दल आदर दाखविण्यासाठी इराणने हेतूपूर्वक आपल्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २००० किलोमीटर अंतरापर्यंत मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे युरोपिय देशांनी देखील यापुढे इराणबाबत असाच आदर दाखवावा’, असे हाजिझादेह यांनी धमकावले.

याआधी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने आपल्याकडे १००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारी क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर इराणच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमावर इस्रायलने गंभीर चिंता व्यक्त केली होती. पाश्चिमात्य देश इराणच्या धोक्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका इस्रायलने केली होती. मात्र ब्रिगेडिअर जनरल हाजिझादेह यांनी भूमध्य समुद्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि थेट युरोपिय देशांपर्यंत आपली क्षेपणास्त्रे पोहोचू शकतात, याची जाणीव करून दिली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देत असताना ब्रिगेडिअर जनरल हाजिझादेह यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ देखील इराणच्या निशाण्यावर असल्याचे हाजिझादेह यांनी धमकावले. तीन वर्षांपूर्वी, २०२० साली इराकची राजधानी बगदादमध्ये इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशांवर ही कारवाई झाली होती.

iran missile rangeइराणमध्ये सर्वात लोकप्रिय लष्करी अधिकारी असा सुलेमानी यांचा उल्लेख केला जात होता. त्यामुळे सुलेमानी यांची हत्या झाल्यानंतर पेटून उठलेल्या इराणने ट्रम्प यांच्यासह माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ तसेच या कारवाईत सहभागी असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना ठार करण्याची धमकी दिली होती. हाजिझादेह यांनी पुन्हा एकदा याची आठवण करुन दिली व ट्रम्प आणि पॉम्पिओ इराणच्या रडारवर असल्याचे धमकावले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले असून त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत. माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ देखील अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या दोघांनाही संपविण्याची इराणने दिलेली धमकी लक्षवेधी ठरते.

leave a reply