तुर्की-सिरियाच्या भूकंपातील बळींची संख्या ५० हजारांवर

१९ दिवसात भूकंपाचे नऊ हजाराहून अधिक धक्के बसले

अंकारा/दमास्कस – तुर्की-सिरियातील प्रलयंकारी भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या ५० हजारांच्या पलिकडे गेली आहे. एकट्या तुर्कीत ४४ हजारांहून अधिक जण ठार झाले तर सिरियामध्ये जवळपास सहा हजार जण दगावले. शनिवारी सकाळी ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला. गेल्या १९ दिवसांमध्ये या भागात ९००० हून अधिक भूकंपाचे हादरे बसले असून यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचा दावा केला जातो.

turkey quake 50k६ फेब्रुवारी रोजी तुर्की-सिरियाच्या सीमाभागाला ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. तुर्कीतील बेजबाबदाररित्या केलेली इमारतींची बांधकामे या भूकंपाच्या धक्क्यात पत्त्यासारखी कोसळली. तुर्कीच्या ‘डिझास्टर अँड इमर्जन्सी मॅनेजमेंट अथॉरिटी’ने शुक्रवारी उशीरा दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाने तुर्कीतील ४४२१८ जणांचा बळी गेला तर ८० हजारांहून अधिक जण जखमी झाले.

तुर्कीच्या हताय भागात अजूनही कितीतरी इमारतींचे ढिगारे उपसलेले नाहीत. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली आणखी शेकडो नागरिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. बचावकार्यासाठी जवळपास अडीचलाख जण उतरल्याचा दावा तुर्कीच्या यंत्रणा करीत आहेत. पण एर्दोगन यांचे सरकार बचावकार्याशी प्रामाणिक नसल्याचा आरोप तुर्कीत वाढू लागला आहे.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन या भूकंपातील बचावकार्याचे भांडवल करून मे महिन्यातील निवडणूक लढवणार असल्याचा ठपका तुर्कीतील विरोधी गट करीत आहेत. याउलट आंतरराष्ट्रीय सहाय्यापासून काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या सिरियामध्ये अस्साद यांच्या राजवटीने बचावकार्य व्यवस्थितरित्या राबविल्याचा दावा केला जातो. यामुळे सिरियामध्ये अस्साद यांची लोकप्रियता वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सिरियातील काही भूकंपग्रस्त भागातील शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत.

leave a reply