महाराष्ट्रात चोवीस तासात ९७४ जणांचा बळी

नवी दिल्ली/ मुंबई – महाराष्ट्रात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे सुमारे ३४ हजार नवे रुग्ण आढळले. मात्र या साथीने होणार्‍या मृत्यूंची संख्या वाढली आहे. शनिवारी राज्यात ९६० जणांचा बळी गेला होता. तर रविवारी एकूण ९७४ जण दगावले आहेत. याआधी शुक्रवारी ६९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनले आहे.

९७४ जणांचा बळीमहाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात चोवीस तासात नोंद होणार्‍या कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तीन लाख ११ हजार नवे रुग्ण आढळले.

दरदिवशी आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या दीड आठवड्यांपूर्वी चार लाख १० हजारांपर्यंत पोहोचली होती. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्येही दरदिवशी आढळणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने हे पाहायला मिळत आहे. असे असले, तरी दरदिवशी कोरोनाने दगावणार्‍या रुग्णांची संख्या अजूनही ४ हजाराच्या घरात आहे. रविवार सकाळपर्यंत चोवीस तासात ४ हजार ७७ जण दगावल्याची नोंद करण्यात आली होती.

देशात सर्वाधिक मृत्यु हे महाराष्ट्रातच होत असून दरदिवशी होणारे मृत्यू सुमारे हजारपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात रविवारी ९७४ जणांचा बळी गेला. यामुळे महाराष्ट्रात कोरोना आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या ८१ हजारांवर पोहोचली आहे. कर्नाटकात ४०३ जण एकाच दिवसात कोरोनाने मृत्यूमुखी झाले. उत्तर प्रदेशमध्ये ३११ जणांचा एका दिवसात कोरोनाने बळी गेला आहे. दिल्लीत २६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली या चार राज्यातच देशात कोरोनामुळे होणारे निम्मे मृत्यू होत आहेत. गुजरात, पश्‍चिम बंगालमध्ये मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे.

leave a reply